हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दुसरे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले, उपांत्यपूर्व फेरीतच नेदरलॅंड्सकडून पराभूत

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर झालेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान भारताचा नेदरलॅंड्सकडून 1-2 असा पराभव झाला. यामुळे भारताचे दुसरा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूरे राहिले आहे.

या सामन्यात भारताकडून आकाशदिप सिंग तर नेदरलॅंड्सकडून ब्रिंकमन थिएरी आणि वॅन देर विर्डेन मिंक यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दुसरा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरणाऱ्या भारतीय संघाने सामन्याला चांगली सुरूवात करत नेदरलॅंड्सच्या बचावफळीला आव्हान दिले. यावेळी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाली. 12व्या मिनिटाला आकाशदिप सिंगने गोल करत भारताचे खाते उघडले. पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटात थिएरीने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

या विश्वचषकातील इतर संघापेक्षा नेदरलॅंड्सचे आक्रमण उत्कृष्ठ आहे. तसेच त्यांनी 136वेळा पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र भारतीय संघाने त्यांना दुसऱ्या सत्रात रोखून धरले. यावेळी दोन्ही संघानी समान खेळ केला.

तिसऱ्या सत्रात नेदरलॅंड्सने त्यांचा खेळ उंचावला. यामध्ये त्यांना तीन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. तर सहा वेळा पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला. मात्र भारताच्या बचावफळी आणि गोलकिपर पीआर श्रीजेश पुढे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

बरोबरी असल्याने दोन्ही संघाने चौथ्या सत्राला आक्रमकपणे सुरूवात केली. 50व्या मिनिटाला मिंकने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 2-1 अशी आघाडी मिळवली. या सत्रात भारताने त्यांचा गोलकिपर काढत अधिक खेळाडू मैदानात उतरवला.

शेवटच्या क्षणापर्यत भारताचे सामना बरोबरीत आणण्याचे प्रयत्न सुरूच होते. 55व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताला सामना बरोबरी आणण्याची संधी होती. मात्र ते अपयशी ठरले. याचबरोबरच भारताचे दुसरा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंग झाले आहे. याआधी भारताने 1975ला भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता. तर नेदरलॅंड्सने आत्तापर्यंत 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे.

भारताचा डिफेंडर सुरेंदर कुमार हा सामनावीर ठरला. त्याने आजच्या सामन्यात उत्तम खेळ केला.

तसेच नेदरलॅंड्स उपांत्य फेरीचा सामना 15 डिसेंबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघावर विजय मिळवत बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक

सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…

आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?