भारतीय संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास!

भारताने काल बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला ३६ धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात धडाकेबाज एन्ट्री केली. आता रविवारी भारताचा सामना यजमान इंग्लंडशी आहे आणि तो ही क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर.

भारतासाठी ही स्पर्धा एखाद्या रम्य स्वप्नासारखी ठरली आहे. भारत आज अंतिम सामन्यात पोहचला आहे याचे कारण कोणी एक खेळाडू नसून संघाने केलेली एकत्रित कामगिरी आहे. आता पर्यंतच्या ८ सामन्यात प्रत्येक वेळी सामनावीराचा मान हा वेगवेगळ्या खेळाडूला मिळाला आहे आणि हे सांघिक खेळाचे उत्तम प्रतिक आहे.

विश्वचषक २०१७ चा भारताचा पहिला सामना हा यजमान इंग्लंड बरोबर झाला आणि त्यात मानधना आणि राऊत यांनी उत्तम फलंदाजी केली, त्यामुळेच भारताने हा सामना ३५ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला ७ विकेट्सने पराभूत केले त्यात मानधनाच्या शतकाचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणाऱ्या पाकिस्तान संघाला ९५ धावांनी भारताने पराभूत केले. या सामन्यात एकता बिश्तने १८ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या.

अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका संघाला भारताने १६ धावांनी मात दिली. या सामन्यात शर्मा आणि राज यांच्या फलंदाजीने भारताला तारले. त्यानंतर पुढील दोनीही सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. दक्षिण आफ्रिका संघाने ११५ धावांनी मात दिली तर ऑस्ट्रेलिया संघाने ८ विकेट्सने भारताला नमवले. या दोनीही सामन्यात भारताच्या फलंदाजीने नांगी टाकली.

त्यानंतर उपांत्य फेरीत जाण्यासाठी करो वा मारो सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा १८६ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोनीही खुलून आल्या. या सामन्याची मानकरी भारताची कर्णधार मिताली राज ठरली, तिच्या १०९ धावांच्याच शतकी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला होता.

कालच्या सामन्यातही भारताचे वरच्या फळीतले फलंदाज लवकर बाद झाले होते पण हरमनप्रीती कौरच्या अविस्मरणीय खेळीमुळे भारत सामना जिंकून शकला.

इंग्लंडला भारताने या स्पर्धेत पराभूत केले आहे त्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला असेल तर इंग्लंड मागील सामन्याचा सूड घेऊन घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्यास उत्सुक असेल.