इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- हरयाणा हिरोज संघाचा पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 45-35 असा विजय

पुणे । सतनाम सिंगने चढाईत तर, रामदयाल व विकास खत्री यांनी बचावात केलेल्या जोरदार कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत हरयाणा हिरोज संघाचा पाँडिचेरी प्रिडेटर्स संघावर 45-35 असा विजय मिळवला. सामन्यातील पहिले क्वॉर्टर बरोबरीत राहिल्यानंतर हरयाणा संघाने चांगला खेळ करत विजय नोंदवला.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या क्वॉटरमध्ये हरयाणा हिरोज व पाँडिचेरी प्रिडेटर्स संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. दोन्ही संघांकडून खेळाडूंनी गुण मिळवण्याची कोणतीच संधी सोडली नाही. त्यामुळे पहिल्या क्वॉर्टरअखेरिस सामना 12-12 असा बरोबरीत होता. दुस-या सत्रामध्ये हरयाणा हिरोज संघाकडून सतनाम सिंगने चढाईत तर, रामदयालने बचावात चमक दाखवत दुसरे क्वॉर्टर 10-9 असे आपल्या नावे करत मध्यंतरापर्यंत 22-21 अशी आघाडी घेतली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये हरयाणा हिरोज संघाकडून सतनाम सिंगने चढाईत बाजी मारली तर, विकास खत्रीने बचावात चुणुक दाखवत 14-7 अशी क्वॉर्टरमध्ये चमक दाखवत सामन्यात 36-28 अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये रामदयालने बचावात चमक दाखवत प्रतिस्पर्धी संघाने अनेक चढाईपटू माघारी धाडली. त्यामुळे संघाने शेवटचे क्वॉर्टर 9-7 असे आपल्या नावे करत सामन्यात देखील विजय मिळवला.

मंगळवारचे सामने :
– दिलेर दिल्ली वि.मुंबई चे राजे (19 वा सामना ) (8 -9 वाजता)
– चेन्नई चॅलेंजर्स वि. तेलुगु बुल्स (20 वा सामना ) (9-10 वाजता)