इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- पुणे प्राईड संघाचा बंगळूरु रायनोजवर 40-33 असा विजय

पुणे । अमरजित सिंग याची चढाईत तर, जसकीरत सिंग व संदीप खरब यांनी बचावफळीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत पुणे प्राईड संघाने बंगळूरु रायनोजवर 40-33 असा विजय मिळवला. पुणे प्राईड संघाचा हा सलग पाचवा विजय आहे. पराभूत बंगळूरु संघाकडून वैभव कदम, विपिन मलिक व अरुमुगुम यांनी चांगला खेळ केला.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या क्वॉटरमध्ये बंगळूरु रायनोज संघाने आपल्या चढाईपटूंच्या जोरावर 9-8 अशी एका गुणाची आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये पुणे प्राईड संघातील खेळाडूंनी चमक दाखवली. अमरजित सिंग, संदीप खरब, जसकीरत सिंग यांनी गुणांची कमाई करत दुस-या क्वॉर्टरमध्ये 9-6 अशी बाजी मारत मध्यंतरापर्यंत 17-15 अशी दोन गुणांची आघाडी घेतली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये बंगळूरु बुल्स संघाचे आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण, पुणे प्राईड संघाकडून बंगळूरुला सहजासहजी गुण मिळवण्यास देत नव्हते. दोन्ही संघांच्या बचावफळीने चांगला खेळ दाखवला. त्यामुळे तिसरे क्वॉर्टर 8-8 असे बरोबरीत राहिले. पण, पुण्याच्या संघाला सामन्यात 25-23 अशी आघाडी घेण्यात यश मिळाले. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये देखील दोन्ही संघांमध्ये गुणांसाठी चांगली चुरस ही पहायला मिळाली. पण, पुणे प्राईडच्या अमरजित सिंह व संदीप खरबने चांगली कामगिरी करत शेवटच्या क्वॉर्टरमध्ये 15-10 अशी चमक दाखवत विजय मिळवला.

मंगळवारचे सामने :
– दिलेर दिल्ली वि.मुंबई चे राजे (19 वा सामना ) (8 -9 वाजता)
– चेन्नई चॅलेंजर्स वि. तेलुगु बुल्स (20 वा सामना ) (9-10 वाजता)
……………………………….