इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग: पाँडिचेरी प्रिडेटर्स संघाचा पुणे प्राईडवर 41-33 असा विजय

मैसूर। आर.रमेश कुमार व सोमबीर कालिरमन यांनी चढाईत तर, सोनू एस.एस.के ने बचावात केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत पाँडिचेरी प्रिडेटर्स संघाने पुणे प्राईडवर 41-33 असा विजय मिळवला. पुण्याचा स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे. त्यांचे आता सहा सामन्यानंतर पाच विजय आहेत.

मैसूरच्या चामुंडीविहार येथे सुरु असलेल्या या सामन्यात पुणे प्राईड व पाँडिचेरी प्रिडेटर्स यांमध्ये चुरस पहायला मिळाली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये आर. सुरेश कुमारने चढाईत चमक दाखवत 10-9 अशी आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये पाँडिचेरी संघाच्या खेळाडूंनी यानंतर चढाई व बचावात चमक दाखवली. त्यामुळे दुस-या क्वॉर्टरमध्ये 12-7 अशी बाजी मारत मध्यंतरापर्यंत संघाने 22-15 अशी आघाडी घेतली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये देखील पुणे प्राईड संघाच्या अब्दुल शेखने चांगली कामगिरी करत 12-7 अशी चमक दाखवली. पण, चौथ्या क्वॉर्टरमध्ये पाँडिचेरी प्रिडेटर्स संघाने जोरदार कामगिरी करत 12-6 असे क्वॉर्टर आपल्या नावे करत सामन्यात देखील विजय नोंदवला. पाँडिचेरीकडून आर.रमेश कुमारने निर्णायक कामगिरी केली. त्याला बचावात देखील इतर खेळाडूंची चांगली साथ मिळाली.

शुक्रवारचे सामने :

– चेन्नई चॅलेंजर्स वि. मुंबई चे राजे (24 वा सामना ) (8 -9 वाजता)
– हरयाणा हिरोज वि. दिलेर दिल्ली (25 वा सामना ) (9-10 वाजता)
– पुणे प्राईड वि. तेलुगु बुल्स (26 वा सामना ) (10-11 वाजता)
.
सामन्यांचे थेट प्रक्षेपण डी स्पोर्ट्स, डी डी स्पोर्ट्स, एमटीव्ही आणि एमटीव्ही एचडी प्लसवर 8.00 वाजल्यापासून