इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- तेलुगु बुल्स संघाचा मुंबई चे राजे संघावर 39-28 असा विजय

पुणे । अभिनंदन कुमार व नागेश्‍वर सिंग यांच्या चढाया तर, एम सुमन यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत तेलुगु बुल्स संघाने मुंबई चे राजे संघाला 39-28 असे पराभूत केले. मध्यंतरापर्यंत पिछाडीवर असलेल्या तेलुगु बुल्स संघाने दुस-या सत्रामध्ये जोरदार कामगिरी करत विजय मिळवला.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या क्वॉटरमध्ये मुंबई चे राजे संघाने चांगला खेळ करत 8-7 अशी तेलुगु बुल्स संघावर अवघ्या एका गुणाची आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये देखील मुंबईच्या संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवला. त्यांच्या महेश तिम्मापूर व दिलजित सिंह चौहान यांनी चढाईमध्ये चमक दाखवली व दुस-या क्वॉर्टरमध्ये 9-7 अशा आघाडीसह मध्यंतराला 17-14 अशी आघाडी घेतली.

तिस-या क्वॉर्टरमध्ये तेलुगु बुल्स संघाने आक्रमक पवित्रा घेतला.त्यांच्या अभिनंदन कुमारने चढाईमध्ये चमक दाखवत संघासाठी निर्णायक कामगिरी केली व तिसरे क्वॉर्टर 13-4 असे आपल्या नावे करत सामन्यात देखील 27-21 अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये देखील तेलुगु बुल्सने मुंबई चे राजे संघाला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता क्वॉर्टर 12-7 असे आपल्या नावे करत सामना खिशात घातला.

मंगळवारचे सामने :
– दिलेर दिल्ली वि.मुंबई चे राजे (19 वा सामना ) (8 -9 वाजता)
– चेन्नई चॅलेंजर्स वि. तेलुगु बुल्स (20 वा सामना ) (9-10 वाजता)