इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- बंगळुरू रायनोजचा हरयाणा हिरोजवर 47-41 असा विजय

पुणे । अरुमूगम व विपिन यांच्या चढाया आणि मनोज व अंबेसरन यांनी बचावात केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर बंगळुरू रायनोज संघाने हरयाणा हिरोजवर 47-41 असा विजय मिळवला. पहिला क्वॉर्टर बरोबरीत राहिल्यानंतर बंगळुरू संघाने पुनरागमन करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले व विजय नोंदवला.

ब पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्या क्वॉर्टरमध्ये हरयाणा हिरोज व बंगळूरु रायनोज यांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली.दोन्ही संघातील चढाईपटू आणि बचावपटूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर पहिला क्वार्टर बरोबरीत राहिला.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील दोन्ही संघामध्ये अशीच चुरस पहायला मिळाली.पण, यावेळी बंगळुरू संघाकडून अरुमूगम (5 गुण) व विपिन मलिकने (4 गुण) चढाईत चमक दाखवत दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये 13-7 अशी आघाडी घेत मध्यंतरापर्यंत बंगळुरुकडे 24-18 अशी आघाडी घेतली. बंगळुरुकडून बचावात मनोजने (3 गुण) चमक दाखवली.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये बंगळुरू रायनोज संघाने आपला खेळ आणखीन आक्रमक केला.अरुमूगम व विपिन यांनी चढाईत संघासाठी निर्णायक गुण मिळवत चमक दाखवली.हरयाणा संघाकडून विकासने बचावात गुण मिळवले पण, त्याला चढाईत म्हणावी तशी साथ मिळत नव्हती.त्यामुळे तिसरे क्वॉर्टर बंगळुरूने 13-7 असे आपल्या नावे करत आघाडी 37-25 अशी भक्कम केली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघामध्ये गुण मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली.हरयाणा संघाकडून आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण, बंगळुरूचे खेळाडू देखील त्यांना संधी देत नव्हते.पण, तरीही हरयाणाच्या खेळाडूंनी गुण मिळवत शेवटचे क्वार्टर बरोबरीत ठेवले तरीही त्यांना पराभव टाळता आला नाही.

शनिवारचे सामने :
दिलेर दिल्ली वि.तेलुगु बुल्स (सामना अकरावा) ( 8 -9 वाजता)
चेन्नई चॅलेंजर्स वि. मुंबई चे राजे (सामना बारावा) (9-10 वाजता)