पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का

हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात आजपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर विंडीजने  95 षटकात 7 बाद 295 धावा केल्या आहेत.

मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताकडून या सामन्यातून कसोटी पदार्पण करणारा 26 वर्षीय शार्दुल ठाकुरला पहिल्याच सत्रात मांड्यांचे स्नायू दुखावल्याने मैदानाबाहेर जावे लागले आहे.

त्यानंतर तो संपूर्ण दिवस मैदानात आला नाही. त्याला पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना फक्त 10 चेंडूच टाकता आले.

त्याच्या या दुखापतीबद्दल बीसीसीआयने सांगितले आहे की, ‘शार्दुलचे स्कॅन करण्यात आले आहे. तो पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करणार नाही. स्कॅनच्या रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि संघ व्यवस्थापनाने तपासल्यानंतर उर्वरीत दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागावर निर्णय घेतला जाईल.’

त्याच्या दुखापतीची घटना सामना सुरु झाल्यानंतर चौथ्या षटकात झाली. त्यावेळी शार्दुल त्याचे दुसरे षटक टाकत होता. पण त्यावेळी तो संघर्ष करत होता.
त्यामुळे या षटकातील चौथ्या चेंडूनंतर भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट हे मैदानावर आले आणि शार्दुलला तपासले. पण दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी शार्दुलला ड्रेसिंगरुममध्ये परतण्यास सांगितले.त्यानंतर त्याचे उर्वरित षटक आर अश्विनने पूर्ण केले. 

 

याआधीही शार्दुलला याच दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कप स्पर्धेलाही दुसऱ्या सामन्यानंतर मुकावे लागले होते.

 

शार्दुल हा भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 294 खेळाडू ठरला आहे. तसेच तो यावर्षी कसोटीत पदार्पण करणारा भारताचा एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. यावर्षी शार्दुलबरोबरच जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे.

याआधी 2013 मध्ये एका वर्षात 5 भारतीय खेळाडूंनी कसोटीत पदार्पण केले होते. यात मोहम्मद शमी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंचा समावेश होता.

त्याचबरोबर भारताच्या सलग तीन सामन्यात अनुक्रमे हनुमा विहारी, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकुर या तीन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे. असे याआधी शेवटचे 2013 मध्ये झाले होते. त्यावेळी धवन, रहाणे आणि शमी यांनी सलग तीन कसोटीत पदार्पण केले होते.

महत्वाच्या बातम्या-

आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे

फलंदाजांसाठी गोलंदाज अनिल कुंबळेने केली जगातील सर्वात भारी गोष्ट

कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा धक्का