सेमीफायनल आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; हा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श बाहेर पडला आहे. त्याला मनगटाजवळ फ्रॅक्चर झाल्याने या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याऐवजी उर्वरित विश्वचषकासाठी यष्टीरक्षक फलंदाज पिटर हँड्सकॉम्बला संघात सामील करुन घेतले आहे.

गुरुवारी(4 जूलै) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर नेटमध्ये सराव करत असताना मार्शला संघसहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू हाताला लागला. त्यामुळे मार्शला लगेचच स्कॅन करण्यासाठी पाठवण्यात आले. स्कॅनमध्ये त्याला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले, ‘शॉनला सराव करताना चेंडू लागल्यानंतर त्याच्या उजव्या हाताचे स्कॅन करण्यात आले आहे. दुर्दैवाने स्कॅनमध्ये त्याच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे आढळले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे.’

‘शॉनसाठी आणि संघासाठी ही धक्कादायक बातमी आहे. या स्पर्धेदरम्यान, त्याचा आत्मविश्वास, व्यावसायिकता आणि ज्याप्रकारे त्याने स्पर्धा केली आहे, ते शानदार आहे.’

शॉनला या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध संधी मिळाली होती. पण या दोन सामन्यात मिळून त्याला 26 धावाच करता आल्या होत्या.

शॉनऐवजी संघात संधी मिळालेल्या हँड्सकॉम्बबद्दल लँगर म्हणाले, ‘हँड्सकॉम्ब मधल्या फळीतील चांगला खेळाडू आहे. त्याने आमच्या भारत आणि यूएई दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती.’

गुरुवारी शॉन बरोबरच ग्लेन मॅक्सवेललाही सरावादरम्यान मिशेल स्टार्कचा चेंडू हाताला लागला होता. पण चेंडू लागल्यानंतर लगेचच करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याची दुखापत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.

पण पुढील काही दिवस त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जाईल असे लँगर यांनी सांगितले आहे. तसेच ते असेही म्हणाले की मॅक्सवेल शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत फिट होऊन चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीने पाळला शब्द; क्रिकेट चाहत्या ८७ वर्षीय आजींसाठी केली ही खास गोष्ट

बांगलादेश विरुद्ध एमएस धोनीने केलेल्या खेळीबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाला…

पृथ्वी शाॅ दुखापतग्रस्त नसून या कारणामुळे संघाबाहेर?