एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर

दुबई। काल(19 सप्टेंबर) पाकिस्तान विरूध्द झालेल्या सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत 8 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानची सुरूवात अडखळत झाली. तर भारतीय गोलंदाजी पुर्ण लयीत दिसून आली.

पण या सामन्यानंतर भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. दुखापतीमुळे अष्टपैलू हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला उर्वरित एशिया कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याचे वयक्तिक 5 वे आणि सामन्यातील 18 षटक टाकत असताना दुखापत ग्रस्त झाला होता. त्याला या सामन्यादरम्यान स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले आहे.

त्याच्या कमरेच्या मागच्या भागातील स्नायू दुखावले गेल्याने त्याला एशिया कप स्पर्धेतून बाहेर जावे लागणार आहे. त्याच्या जागी दिपक चहरला संघात स्थान देण्यात आले आहे.

मात्र त्यानंतरही या सामन्यादरम्यान भारतीय संघात दुखापतींचे सत्र चालूच राहिले. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अक्षर पटेलच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. त्याच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला हाँगकाँग विरूध्दच्या सामन्यात पाठीच्या आणि मांडीच्या मधल्या स्नायूत वेदना झाल्या होत्या. या वेदनेत वाढ झाल्याने तो स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज सिध्दार्थ कौल याला संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेतील साखळी फेरीचे दोन्ही सामने जिंकले असुन सुपर फोरच्या फेरीत प्रवेश केला आहे. सुपर फोर फेरीचे सामने 21 सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?

एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्सने मोठा विजय