आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग- बीएसओए, पीव्हीपीसीओए संघाची विजयी सलामी

पुणे । ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसओए) आणि पद्मभूषण डॉ. वसंतदाद पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीव्हीपीसीओए) या संघांनी शिअरफोर्स क्रीडा स्पधेर्तील फुटबॉलमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.

वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यात फुटबॉलमध्ये सलामीच्या लढतीत बीएसओए संघाने अनंतराव पवार कॉलेज आॅफ आर्किटेक्चर (एपीसीओए) संघावर १-०ने मात केली. यात देवाज बाविस्करने ९ व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. दुस-या लढतीत पीव्हीपीसीओए संघाने अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ( एसीओए) संघावर १-०ने मात केली. यात ५ व्या मिनिटाला पार्थ मठकरीने गोल करून पीव्हीपीसीओए संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून पीव्हीपीसीओए संघाने बाजी मारली. सौरभने (७ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर आकुर्डीच्या डी. वाय. पाटील कॉलेजने महाराष्ट्र मित्र मंडळ कॉलेज आॅफ आर्किटेक्चर (एमएमसीओए) संघावर १-०ने मात केली.

व्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय
मुलांच्या गटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजने भारतीय विद्यापीठाच्या संघावर २५-११ने मात केली. यात डी. वाय. पाटील कॉलेजकडून साईराजने चमकदार कामगिरी केली. दुस-या लढतीत बीएसओए संघाने बीएक्सपीएस संघावर २५-१६ने विजय मिळवला. मुलींच्या गटात डी. वाय. पाटील कॉलेजने एमएमसीए संघावर २५-११ने मात केली. यात सुभदा खाडकेने चमक दाखवली. यानंतर आकांक्षा जाधवच्या सुरेख खेळाच्या जोरावर पीव्हीपीसीओए संघाने भारतीय विद्यापीठ संघावर २५-१६ने मात केली.

बास्केटमध्ये असदचा विजय
मुलांच्या गटात आयोजन स्कूल आॅफ आर्किटेक्चर (असद) संघाने इंदिरा कॉलेज संघावर ३१-२१ने मात केली. असद संघाकडून सौरभ चंदवाडकर, यश वर्मा यांनी चांगला खेळ केला, तर इंदिरा कॉलेजकडून नवीन राइकर, रमेश सुतार यांची लढत एकाकी ठरली. यानंतर डी. वाय. पाटील संघाने भारतीय विद्यापीठ संघावर २५-२० असा पाच गुणांनी पराभव केला. डी. वाय. पाटील संघाकडून आदर्श यादव (७), सुजय चौधरी (६) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय विद्यापीठाच्या आकाश पाटील (१४) आणि प्रज्वल (४) यांचे प्रयत्न अपूर्ण ठरले.

स्पर्धेचे उद्घाटन व्हिआयटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते झाले. यावेळी विराज परदेशी, इंद्रकुमार छाजेड, जितेंद्र पितळीया आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष आहे.