दिव्यांगाची आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून

पोलीस जिमखान्यावर दक्षिण विभाग आणि पूर्व विभागात उद्घाटनीय सामना

मुंबई । जगण्यात आयुष्यभराची धडपड असलेल्या दिव्यांगांमध्ये जगण्याची, खेळण्याची उमेद निर्माण करण्यासाठी आयोजित आठव्या एलआयसी चषक आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्यापासून मुंबईच्या पोलीस जिमखान्यावर प्रारंभ होतोय. पाच विभागीय संघाचा सहभाग असलेल्या या तीनदिवसीय स्पर्धेत दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील लढतीने दिव्यांगांच्या फटकेबाजी सुरूवात होईल.

शरीराने दुबळे असूनही क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडण्याचे ध्येय गाठणाऱया दिव्यांग क्रिकेटपटूंचा अंगावर शहारे आणणारा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर क्रीडाप्रेमींना उद्या शुक्रवारपासून लाभेल.

ज्या देशात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि खेळाडूंना देवाचा दर्जा दिला जातो, अशा आपल्या देशात दिव्यांगांचे क्रिकेट नेहमीच उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे. मात्र अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील दिव्यांगाना आपल्या क्रिकेटचे कौशल्य दाखविताना येईल.

देशभरातील झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर त्यात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पाच विभागीय संघ बनविण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकंदर दहा साखळी सामने खेळविले जाणार असून या तीनदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना 1 एप्रिलला नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगेल.

या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश सैनी, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया आणि बलविंदर सिंगसारखे खेळाडूही खेळताना दिसतील.

शरीराने दिव्यांग असूनही आपल्या क्रिकेटच्या प्रेमाखातर धडाकेबाज खेळ करणाऱ्या या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी आवर्जुन यावे, असे आवाहन वाडेकर यांनी केले आहे.

दिव्यांग क्रिकेटपटूंची राष्ट्रीय स्पर्धा दिमाखदार व्हावी म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मुख्य पुरस्कर्ते म्हणून पुढाकार घेतला असून न्यू इंडिया ऍश्युरन्स, इंडियन ऑईल, जीआयसी, एचडीएफसी, युनियन बँक आणि सेंट्रल बँक यांचे सहकार्य लाभले आहे.

या तीन दिवसीय स्पर्धेचे आयोजन पोलीस जिमखान्याच्या दर्जेदार मैदानासह नॅशनल क्रिकेट क्लब आणि कर्नाटक स्पोर्टिंगच्या मैदानावरही केले जातेय.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर, न्यू इंडिया ऍश्युरन्सचे महाव्यवस्थापक एस. शंकर, जीआयसी रे च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ऍलिस वैद्यन, एलआयसीचे पंकज गोपाल, युनियन बँकेचे अशोक नायर, माजी कसोटीपटू करसन घावरी आणि उमेश कुलकर्णी , सेंट्रल बँकेचे के.के.तनेजा, राज्याचे उप क्रीडा संचालक एन.बी.मोटे यांच्या उपस्थितीत पार पडेल.

आंतरविभागीय राष्ट्रीय स्पर्धेचे संघ

पूर्व विभाग : मनीष सिंग, भोला पासवान, भोला बावरी, अमित कुमार, सुमीत कुमार, बलराम महतो, राजेंद्र प्रसाद, प्रकाश अहिरी, अभिजीत बिस्वास, तपन बैरागी, समरेश बिस्वास, कांचन कुमार, कुणाल कुमार, बलराम बस्तिया, बलराम पांडा, ललित कुमार.

पश्चिम विभाग: सौरभ रवालिया (कर्णधार), स्वप्निल मुंगेल, कुणाल फणसे, सचिन शनगार, अजय म्हात्रे, मयुरेश संसारे, सचिन गायकवाड, दम्मापाल जाधव, दशरश जामखंडी, असित जैसवार, केवल पटेल, रोहन वाघेला, बलवंत खंत, परशुराम, नरेश परमार, जगदीश ममुडा

मध्य विभाग: श्रीमंत झा (कर्णधार), संजय दत्त कौशिक, पंकज कुमार, भगवत साहु, एन. एस. राव, जितेंद्र निशाद, महताब अली, रोवेश कुमार, सलमान, राहुल मधुरिया, श्याम खाटिक, अजय भुटे, शेख नझीर, यशवंत वाघ.

दक्षिण विभाग: कन्नडासन (कर्णधार), ऍन्थनी, सुरेश,सुगणेश, व्ही. रोशी रेड्डी, एस. नूरूला हुडा, व्ही. विजयकुमार, एन. सुब्बा राव, विष्णू, अनिश रंजन, प्रसाद, रमेश, मंजुनाथ, शिवू, विनोथ.

उत्तर विभाग: दिनेश कुमार (कर्णधार), यशसिंग नेगी, विश्व वर्धन, भाटी, अंशुल, पंकज कुमार, लकबिंदर सिंग, बिजेंदर सैनी, पवन कुमार, हेमंत कुमार, वारिस अली, हरिश, सचिन पुमार, हरिवंश चौहान, हसन खान, मनोज यादव.