जागतिक ताईचीक्वॅन स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकरला रौप्य

पुण्याच्याच अथर्व मोडक, राजमल्हारला कांस्य : ३ ऱ्या जागतिक ताईचीक्वॅन स्पर्धेत भारताची ७ पदकांची कामगिरी

पुणे | आंतरराष्ट्रीय  वुशू फेडरेशनच्या वतीने आयोजित ३ ºया जागतिक ताईचीक्वॅन स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करीत ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
पुण्याच्या श्रावणी कटके हीने यांग स्टाईल ताईचीक्वॅन मध्ये रौप्यपदक पटकाविले आहे. यासोबतच तृप्ती चांदवडकर हीने यांग स्टाईल ताईचीक्वॅन मध्ये रौप्य आणि ४२ ताईचीक्वॅनमध्ये कांस्यपदक पटकाविले.  एसएसबीच्या नऊखंबा मिताई याने देखील रौप्यपदकाची कमाई केली.
पुण्याच्या अथर्व मोडक याने २४ ताईचीक्वॅन आणि ३२ ताईचीक्वॅन मध्ये दोन कांस्य तर राजमल्हार व्हटकर याने ४२ ताईचीक्वॅन मध्ये कांस्य पदकाची कामगिरी केली. २६ सप्टेंबर २०१८ ते  २ आॅक्टोबर २०१८ दरम्यान बल्गेरिया येथील बुरगुस येथे ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सहा जणांची स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये १४ ते १७ वयोगटात अथर्व मोडक, राजमल्हार वटकर, श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकर, कल्याणी जोशी यांचा सहभाग होता. तर १८ ते ३९ वयोगटात एसएसबीच्या नऊखंबा मिताई यांचा सहभाग होता.
भारतीय वुशू महासंघाचे अध्यक्ष भुपेंद्रसिंह बाजवा, उपाध्यक्ष मनीष कक्कड, सचिव सुहेल अहमद,आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी झेंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
 पुण्यातील एस.के. स्पोर्टस् फाऊंडेशनचे सर्व खेळाडू असून महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव आणि प्रशिक्षक सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. संपूर्ण भारतातून १० खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली होती. तेलंगणाचे अब्बास करमानी यांनी देखील भारतीय संघाचे कोच म्हणून काम पाहिले.