टॉप ५: या ५ अनकॅपड खेळाडूंकडे असेल आयपीएल लिलावात लक्ष

यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी चमक दाखवली आहे. त्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायझीसुध्दा या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. यावर्षी देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या अनेक खेळाडूंची नावे आयपीएलच्या लिलावासाठी जाहीर झालेल्या ५७८ खेळाडूंच्या यादीत आली आहेत.

या आठवड्याच्या २७ आणि २८ तारखेला आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या लिलाव होणार आहे. हा लिलाव बंगलोरला होणार असून स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवरून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

भारताच्या या अनकॅपड खेळाडूंकडे असेल आयपीएल लिलावात लक्ष:

नवदीप सैनी: यावर्षीचा रणजी मोसम गाजवणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेला नवदीप सैनी हा एक आहे. त्याने त्याच्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघाला रणजी ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

त्याने आजपर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३० सामन्यात ९६ बळी घेतले आहेत. तसेच यावर्षी रणजीमध्ये ३४ बळी घेतले. त्याने बंगाल विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात ९० धावा देऊन ७ बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फलंदाजांना सराव देण्यासाठी नेट – गोलंदाज म्हणूनही बोलावले आहे.

रजनीश गुरबानी: यावर्षीच्या रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ संघात असलेला आणि विदर्भाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा रजनीश गुरबानीवर सर्वच जण लक्ष ठेऊन आहेत. त्याला मुंबई इंडियन्स संघाने चाचणी घेण्यासाठी देखील बोलावले होते.

त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात एकूण १२ बळी तर दिल्ली विरुद्ध अंतिम सामन्यात ८ बळी घेतले होते. तो या दोन्ही सामन्यात सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता. त्यामुळे फ्रॅन्चायझींमध्ये त्याला संघात घेण्यासाठी स्पर्धा बघायला मिळू शकते.

राहुल त्रिपाठी: मागील वर्षी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी करणारा राहुल त्रिपाठीवर यावर्षी फ्रँचायझी चांगली बोली लावू शकतात. त्याने यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषवले होते.

याबरोबरच त्याची कामगिरीही चांगली झाली होती. त्याने या स्पर्धेत ५० च्या सरासरीने ४५० धावा केल्या. यात त्याच्या २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने मागच्या वर्षी पुणे संघाकडून १४ सामन्यात ३९१ धावा केल्या होत्या.

कृणाल पंड्या: मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडूंपैकी एक असलेला हार्दिक पंड्यावरही यावर्षी सर्वांचे लक्ष असेल. त्याला मुंबई इंडियन्सनेही संघात कायम केलेले नाही त्यामुळे फ्रँचायझी त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक असतील.

परंतु मुंबईकडे त्याला संघात परत घेण्यासाठी राईट टू मॅच कार्डचा पर्याय आहे. त्यामुळे ते हा पर्याय वापरून त्याला पुन्हा संघात घेण्याची शक्यता आहे. पण त्यांना यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

त्याने मुंबईकडून खेळताना मागच्या वर्षी २४३ धावा आणि १० बळी घेतले होते.

पृथ्वी शॉ: यावर्षी पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट चांगलेच गाजवले आहे. त्याने मुंबईकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तसेच त्याने साखळी फेरीत पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली. तसेच पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामनावीराचा पुरस्कारही मिळवला होता.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करताना ९ सामन्यात ९६१ धावा केल्या आहेत.