हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!

बेंगलोर। आयपीएलची गतविजेती मुंबई इंडियन्स यावर्षीच्या हंगामात स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्यांचे गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन बॉण्ड यांना अजूनही विश्वास आहे की मुंबई पुनरागमण करेल.

जर मुंबईला या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर त्यांना पुढील सहाही सामने जिंकावेच लागतील.

मुंबई 8 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्दच्या सामन्यात त्यांना 14 धावांनी पराभूत व्हावे लागले.

तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद भुषवणाऱ्या मुंबईला पुढील सहाही सामने जिंकणे जरूरी आहे. 2015मध्ये जसे आम्ही जिंकलो तसेच यावर्षीही जिंकू असा बॉण्ड यांचा ठाम विश्वास आहे.

“आत्ता आमचे सहा सामने बाकी असून ते सगळे आम्हाला जिंकायचे आहेत. संघात असे खेळाडू आहेत जे हे सामने जिंकून देऊ शकतात. 2015 लाही असेच झाले होते आणि मला विश्वास आहे की यावेळेस पण असेच होईल,” असे बॉण्ड म्हणाले.

बॉण्ड असेही म्हणाले की,”मुंबईच्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवर खूप अभिमान आहे म्हणूनच प्रेरणा ही चिंताजनक बाब नाही.”

“बेंगलोर विरूध्दच्या सामन्यातील त्या 3 षटकातील 60 धावा सोडून मुंबईच्या गोलंदाजांनी चांगले योगदान दिले आहे.”

या सामन्यात जे पी ड्युमिनीने 4थ्या षटकात 22 धावा, हार्दीक पांड्याने 10व्या षटकात 20 धावा आणि मिशेल मक्लेघनने शेवटच्या षटकात 24 धावा असे ते तीन षटके होती.

बॉण्ड यांनी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजी क्रमांकाबाबत बचावात्मक पवित्रा घेतला . ते म्हणाले, “जर तुम्ही संघाच्या यशाकडे बघितले तर रोहित त्यावेळीही 4 क्रमांकावरच फंलदाजी करत होता आणि सामने जिंकत होता. त्याच्या फंलदाजीच्या क्रमांकावरून नेहमीच चर्चा होत असते. मागील गोष्टींचा विचार केला तर क्रमांक 4ची फंलदाजी त्याच्यासाठी योग्य आहे.”