आयपीएल २०१८: मुंबईची पराभवाची हॅट्रिक तर दिल्लीचा या मोसमातील पहिला विजय 

मुंबई। शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आजच्या आयपीएल सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ विकेटने विजय मिळवत या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. दिल्लीने जेसन रॉयच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर या सामन्यात विजय मिळवला. 

मुंबईने दिल्ली समोर विजयासाठी १९५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर जेसन रॉय आणि गौतम गंभीरने ५० धावांची सलामी भागीदारी रचली. या जोडीला मुस्तफिझूर रेहमानने तोडले. त्याने गंभीरला १५ धावांवर असताना बाद केले. 

यानंतर रॉय आणि रिषभ पंतने चांगला खेळ केला. पंतने रॉयची भक्कम साथ देताना २५ चेंडूंतच ४७ धावांची खेळी केली. त्याला कृणाल पंड्याने बाद केले. त्याच्यापाठोपाठ काहीवेळातच अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलही(१३) बाद झाला. 

त्यामुळे फलंदाजीची जबाबदारी रॉय आणि श्रेयश अय्यरवर(२७*) आली. या दोघांनी नंतर आणखी पडझड न होऊ देता दिल्लीला सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात सलामीला आलेला रॉयने शेवटपर्यंत लढत दिली. रॉयने आज ५३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ९१ धावांची खेळी केली. 

मुंबईकडून या सामन्यात कृणाल पंड्या(२/२१) आणि मुस्तफिझूर रहमान(१/२५) यांनी विकेट घेतल्या.  

तत्पूर्वी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १९४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादव(५३), एवीन लेविस(४८) आणि ईशान किशन(४४) यांनी चांगली लढत दिली. मात्र बाकी फलंदाजांना काही खास करता न आल्याने त्यांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या. 

मुंबईकडून बाकी फलंदाजांपैकी कर्णधार रोहित शर्मा(१८), कृणाल पंड्या(११), हार्दिक पंड्या(२), अकिला धनंजया(४*) आणि मयंक मार्कंडे(४*) यांनी धावा केल्या. 

दिल्लीकडून डॅनियल ख्रिस्तियन(२/३५), राहुल तेवतीया(२/३६), ट्रेंट बोल्ट(२/३९) आणि मोहम्मद शमी(१/३६) यांनी विकेट्स घेतल्या.