IPL 2018: कॅप्टन कूल धोनीसह चेन्नईकडे राहणार हे दोन दिग्गज कायम

मागील दोन वर्ष बंदी घालण्यात आलेला चेन्नई सुपर किंग्स संघाने यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांनी परत येताच चेन्नईचा कर्णधार असलेला एमएस धोनीला संघात कायम केले आहे. तसेच धोनी बरोबर त्यांनी सुरेश रैना आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना संघात कायम ठेवले आहे.

चेन्नईने याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. चेन्नई संघाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे चेन्नई संघाने त्यांचे पूर्वीचे खेळाडू कायम ठेवल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद दिला आहे. चेन्नईने ट्विटमध्ये एक फोटो शेयर केला आहे, ज्यात धोनी, जडेजा आणि रैना यांचा जर्सी क्रमांक टाकून या तीन खेळाडूंना ते संघात कायम करत असल्याचे सांगितले आहे.

त्यातच धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा चेहरा बनला होता. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने दोनवेळा आयपीएल विजेतेपद तर दोनवेळा चॅम्पिअन्स लीगचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे चेन्नई धोनीला संघात कायम ठेवणार हे जवळ जवळ निश्चित होते.

याबरोबरच रैना आणि जडेजा यांचे क्षेत्ररक्षण चपळ आहे आणि काही वेळेस गोलंदाजी करताना रैनाचाही उपयोग होतो. तसेच जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगला पर्याय आहे. त्याच्या गोलंदाजीबरोबरच त्याची तळातली फलंदाजी संघाला मजबूत बनवू शकते.

मागील दोन वर्ष धोनी पुणे सुपर जायंट्स संघाकडून तर जडेजा आणि रैना गुजरात लायन्स संघाकडून खेळले आहेत.

परंतु चेन्नईने आर अश्विन या चेन्नईच्या खेळाडूला मात्र संघात कायम केले नाही आणि चेन्नईने आधीच तीनही भारतीय कॅप खेळाडूंना कायम केले असल्याने आता त्यांना अश्विनला आयपीएलच्या मुख्य लिलावाच्या वेळी राईट टू मॅच कार्ड वापरूनही कायम करता येणार नाही.

आज आयपीएल मधील संघांना ते यावर्षी त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार त्यांची नावे जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. हा नावे जाहीर करण्याचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडणार आहे. त्यानुसार चेन्नईने तीन खेळाडूंची नावे दिली आहेत.

चेन्नईला आता मुख्य लिलावाच्या वेळी दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहेत. ज्यामुळे ते त्यांच्या आणखी दोन खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. यामध्ये ते ड्वेन ब्रावोला कायम ठेवण्याची शक्यता आहे.