म्हणून जॉन्टी रोड्सने सोडले मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद !

मुंबई । क्रिकेटप्रेमींचा आवडता माजी क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा लाडका क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी रोड्सने मुंबई इंडियन्सचे हे पद सोडले आहे. २००९पासून मुंबई इंडियन्सचा भाग असणाऱ्या जॉन्टीने हे पद सोडल्यामुळे क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.

त्याने हे पद सोडण्याचे कारण म्हणजे त्याला स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालायचे असल्यामुळे आणि मुंबई इंडियन्सकडून काम करत असताना तेवढा वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.

जॉन्टी रोड्सबद्दल बोलताना या संघाचे मालक आकाश अंबानी म्हणाले, ” मुंबई इंडियन्सच्या ताकदीचा आणि ऊर्जेचा जॉन्टी हा महत्वाचा स्तंभ होता. त्याचे योगदान शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करत असून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहोत. तो या संघाचा आणि परिवाराचा जीवनभर सदस्य असेल. “

जॉन्टी रोड्सच्या जागी मुंबईने क्षेत्ररक्षण म्हणून न्यूझीलँडच्या माजी क्रिकेटपटू जेम्स पॅंमेन्टची नियुक्ती केली आहे.