IPL 2018: किंग्स इलेव्हन पंजाबचे सामने आता होणार या स्टेडियमवर

आयपीएलच्या ११ व्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या घरच्या सामन्यांसाठी मुख्य ठिकाण मोहाली असेल तर दुसरे ठिकाण इंदोर हे असेल. हा निर्णय पंजाब राज्यसरकार आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांच्यात मागच्या वर्षी निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न सुटल्यानंतर घेण्यात आला. पंजाब संघाच्या घरच्या ७ सामन्यांपैकी ४ सामने मोहालीत तर ३ सामने इंदोर येथे होणार आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबच्या फ्रॅन्चायझींनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बीसीसीआयला पंजाब संघाचे सामने मोहालीतून दुसरीकडे हलवण्याची विनंती केली होती. त्यांना पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि राज्य संघटना यांचा पाठिंबा मिळत नसल्याचे त्यांनी कारण दिले होते. तसेच योग्य चाहत्या वर्गाचाही अभाव असल्याचे त्यांनी सांगितले होते.

पंजाब फ्रॅन्चायझींचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्हाला आमचे सामने मोहालीतुन हलवायचे होते, पण राज्यसरकार आणि पंजाब क्रिकेट असोसिएशन यांच्यातील सुरक्षेचा प्रश्न सुटला आहे. आम्हाला मोहालीतील वेगळ्या ऊर्जेत खेळायला मिळेल याचा आनंद आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही ४ सामने मोहालीत आणि राहिलेले ३ सामने इंदोर येथे खेळणार आहोत. हे आमच्यासाठी चांगले ठिकाण आहे. मागीलवर्षी आम्हाला येथून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच मागच्या वर्षी स्टेडियम प्रेक्षकांनी पूर्ण भरलेले होते.”

किंग्स इलेव्हन पंजाबचे मागच्या वर्षीही घरच्या ७ सामन्यांपैकी ४ सामने मोहालीत तर ३ सामने इंदोर येथे घेण्यात आले होते.