आयपीएल २०१८: कोलकाता समोर बँगलोरचे १७७ धावांचे आव्हान

कोलकाता। कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात कोलकाताचा नवीन कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बँगलोरची सुरुवात ब्रेंडन मॅक्युलमने चांगली केली होती. मात्र त्याचा सलामीचा साथीदार क्विंटॉन डिकॉकने(४) लवकर विकेट गमावली.

यानंतर कर्णधार विराट कोहलीने मॅक्युलमला चांगली साथ दिली. मात्र मॅक्युलमला २७ चेंडूत ४३ धावांवर असताना सुनील नारायणाने त्रिफळाचित केले.

यानंतर बँगलोरचा डाव एबी डिव्हिलियर्स आक्रमक फटकेबाजी करत तर विराटने त्याला भक्कम साथ देत सांभाळला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. या दोघांनाही १५ व्या षटकात पाठोपाठ बाद करून नितीश राणाने बँगलोरच्या संघाला मोठा धक्का दिला.

डिव्हिलियर्सने २३ चेंडूत ४४ धावा करताना ५ षटकार आणि १ चौकार मारला. तर विराटने ३३ चेंडूत संयमी ३१ धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यावर मंदीप सिंगने(३७) सर्फराज खान(६) आणि नंतर ख्रिस वोक्सला(५*) साथीला घेत बँगलोरला १७६ धावसंख्या गाठून दिली.

कोलकाताकडून नितीश राणा(२/११), विनय कुमार(२/३०), पियुष चावला(१/३१), सुनील नारायण(१/३०) आणि मिशेल जॉन्सन(१/३०) यांनी विकेट घेतल्या.