आयपीएल २०१८: पंजाबसमोर दिल्लीचे १६७ धावांचे आव्हान 

मोहाली। किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबसमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीकडून कर्णधार गौतम गंभीरने शानदार अर्धशतकी खेळी केली. 

आज पंजाबने नाणेफेक जिंकून देखील प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दिल्लीची सुरुवात खराब झाली त्यांनी कॉलिन मुनरो(४) आणि श्रेयश अय्यर(११) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. त्यानंतर मात्र कर्णधार गौतम गंभीरने बाकी फलंदाजांना साथीला घेत दिल्लीचा डाव सावरायला सुरुवात केली. 

त्याला रिषभ पंतने(२८) चांगली साथ दिली होती. पण तोही स्थिर झाल्यावर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ काही वेळातच गंभीर धावबाद झाला. त्याला आज पदार्पण केलेल्या मुजीब जदरांने धावबाद केले. 

गंभीरने आज ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. मात्र दिल्लीच्या बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही. बाकी फलंदाजांपैकी विजय शंकर(१३), राहुल तेवतीया(९), ख्रिस मॉरिस(२७*) आणि डॅनियल ख्रिस्तियन(१३) यांनी धावा केल्या. 

पंजाबकडून मुजीब(२/२८), कर्णधार आर अश्विन(१/२३), मोहित शर्मा(२/३३) आणि अक्षर पटेल(१/३५) यांनी विकेट्स घेऊन दिल्लीला ७ बाद १६६ धावांवर रोखले.