आयपीएल २०१८: अटीतटीच्या सामन्यात पंजाबचा चेन्नईवर विजय!

मोहाली। शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्सवर ४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबकडून ख्रिस गेलने तुफानी अर्धशतक केले. तसेच चेन्नईकडून कर्णधार एमएस धोनीनेही नाबाद अर्धशतक केले.

पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सलामीवीर फलंदाज शेन वॉटसन(११) आणि मुरली विजयची(१२) विकेट लवकर गमावली. तर त्याच्यापाठोपाठ मागील सामन्यात चांगली खेळी करणारा सॅम बिलिंग्सही(९) बाद झाला.

त्यानंतर मात्र धोनी आणि अंबाती रायडू यांनी संघाचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. पण रायडूला आर अश्विनने केलेल्या उत्तम धावबादामुळे ही जोडी तुटली. रायडूचे अर्धशतक फक्त १ धावेने हुकले. रायडूने ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला.

त्यानंतर जडेजाने धोनीला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आक्रमक खेळण्यात अपयश येत होते. त्यामुळे धावगतीही वाढली होती. अखेर १९ व्या षटकात जडेजा(१९) बाद झाला. त्यानंतर धोनीने शेवटपर्यंत लढत दिली मात्र त्याला शेवटच्या दोन चेंडूंवर ११ धावांची गरज असताना या धावा करण्यात अपयश आले. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातातून निसटला होता.

धोनीने आज त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ४४ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या.

पंजाबकडून अँड्रयू टाय(२/४७), मोहित शर्मा(१/४७) आणि आर अश्विन(१/३२) यांनी विकेट्स घेत चेन्नईला २० षटकात ५ बाद १९३ धावांवर रोखले.

तत्पूर्वी, पंजाबकडून आज ख्रिस गेल आणि केएल राहुलने आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी ७ षटकातच धावफलकावर ९१ धावा लावल्या होत्या. मात्र हे दोघे बाद झाल्यावर बाकी फलंदाजही नियमित अंतराने बाद झाले.

आज गेलने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ३३ चेंडूंतच ६३ धावांची खेळी केली. तर राहुलने २२ चेंडूत ३७ धावा केल्या. यात त्याने ७ चौकार मारले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने २० षटकात ७ बाद १९७ धावा केल्या.

पंजाबच्या बाकी फलंदाजांपैकी मयंक अग्रवाल(३०), युवराज सिंग(२०), ऍरॉन फिंच(०), करुण नायर(२९), आर. अश्विन(१४) आणि अँड्रयू टाय(३*) यांनी धावा केल्या. तर चेन्नईकडून शार्दूल ठाकूर(२/३३), इम्रान ताहीर(२/३४), शेन वॉटसन(१/१५), ड्वेन ब्रावो(१/३७) आणि हरभजन सिंग(१/४१) यांनी विकेट्स घेतल्या.