आयपीएल 2018: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबचा दिल्लीवर विजय

दिल्ली। शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली डेयरडेविल्सवर 4 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून श्रेयश अय्यरने शेवट्पर्यंयत लढत दिली. मात्र त्याला बाकी फलंदाजांची योग्य साथ न मिळाल्यामुळे दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले.

दिल्लीसमोर पंजाबने विजयासाठी 20 षटकात 144 धावांचे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरुवात केली होती, मात्र चांगल्या सुरवातीनंतर सलामीवीर पृथ्वी शॉने 22 धावांवर असताना आपली विकेट गमावली.

त्याच्यापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल(12) आणि कर्णधार गौतम गंभीरही(4) बाद झाला. यानंतर चांगली लढत देत असलेल्या श्रेयश अय्यरला रिषभ पंतने(4) साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मुजीब रहमानने त्रिफळाचित केले. त्यानंतर लगेचच डॅनियल ख्रिस्टीनही(6) धावबाद झाला.

यानंतर मात्र राहुल तेवतियाने श्रेयसची चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून 6 व्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली. ही जोडी तोडण्यात अँड्रयू टायला यश आले. त्याने तेवतियाला 24 धावांवर असताना बाद केले.

यानंतरही श्रेयसला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. तसेच पंजाबचा गोलंदाज बरिंदर स्रानने टाकलेल्या १९ व्या षटकात दिल्लीला फक्त ४ च धावा करता आल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात दिल्लीला १७ धावांची गरज होती.

यावेळी श्रेयसने दिल्लीला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मुजीबने उत्तम गोलंदाजी करत श्रेयसला मोठे फटाके मारण्यापासून रोखले. अखेर शेवटच्या चेंडूवर 5 धावा दिल्लीला हव्या असताना श्रेयसने मोठा फटका मारला. पण ऍरॉन फिंचने त्याचा झेल घेत त्याला बाद केले आणि पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

श्रेयसने आज 45 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या साहाय्याने 57 धावा केल्या.

पंजाबकडून मुजीब रहमान(2/25), अँड्रयू टाय(2/25), अंकित राजपूत(2/23) आणि बरिंदर स्रानने(1/45) विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी पंजाबकडून करुण नायर(34), केएल राहुल(23), मयंक अग्रवाल(21) आणि डेव्हिड मिलर(26) यांनी थोडीफार लढत दिली होती. पण बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही. बाकी फलंदाजांपैकी ऍरॉन फिंच(2), युवराज सिंग(14), आर अश्विन(6) आणि अँड्रयू टाय(3) यांनी धावा केल्या.

दिल्लीकडून लायम प्लंकेट(3/17), आवेश खान(2/36), ट्रेंट बोल्ट(2/21) आणि डॅनियल ख्रिस्टीन(1/17) यांनी विकेट्स घेतल्या.