IPL 2018: रणजी ट्रॉफी २०१७ गाजवलेला हा स्टार खेळाडू होऊ शकतो मुंबई इंडियन्सचा भाग

विदर्भाच्या रणजी ट्रॉफी विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा रजनीश गुरबानी यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळू शकतो. तसेच त्याचे विदर्भ संघातील संघ सहकारी आदित्य ठाकरे आणि आदित्य सरवटे हे देखील मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सने या तीन खेळाडूंना चाचणी घेण्यासाठी बोलावले आहे. या चाचण्या त्यांच्या घणसोली येथील आरसीपी मैदानावर १० दिवस चालणार आहेत. काल या चाचण्यांच्या चौथ्या दिवशी मुंबई इंडियन्सच्या फ्रॅन्चायझींनी देशांतर्गत खेळाडूंसाठी ही चाचणी आयोजित केली होती. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि सपोर्ट स्टाफ यांच्या देखरेखीखाली ही चाचणी पार पडली.

आयपीएलचा लिलाव या महिन्यात २७ आणि २८ तारखेला बंगळुरू येथे होणार आहे. तसेच उद्या पर्यंत कोणते संघ त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहे हे कळेल.

विदर्भाने १ जानेवारीला दिल्ली विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम लढतीत विजय मिळवून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. या विजयात रजनीश गुरबानी, आदित्य ठाकरे, सरवटे, फेज फेझल, वासिम जाफर यांसारख्या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले होते.

गुरबानीने यावर्षीच्या रणजी ट्रॉफीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामानावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याने कर्नाटक विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात एकूण १२ बळी तर दिल्ली विरुद्ध अंतिम सामन्यात ८ बळी घेतले होते.

या विजयाबद्दल विदर्भ क्रिकेट असोसिएशनने विजयी खेळाडूंचा ५ जानेवारीला सिव्हिल लाईन्स स्टेडिअमवर सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर देखील हजर राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून विजयी संघातील खेळाडूंना ३ करोड रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. याबरोबरच बीसीसीआयकडून रणजी ट्रॉफीचे विजेते बनल्याबद्दल विदर्भ संघाला २ करोड रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.