IPL 2018: स्मिथ की रहाणे, कोणाला करणार राजस्थान रॉयल्स संघात कायम ?

मागील दोन वर्ष बंदी घालण्यात आलेला राजस्थान रॉयल्स संघ यावर्षी ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवणार असण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्स संघ दोन वर्षाच्या बंदी नंतर यावर्षी पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार राजस्थान रॉयल्स लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून २०१५ आणि २०१६ मध्ये गुजरात आणि पुण्याकडून खेळलेल्या त्यांच्या जास्तीतजास्त ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतात.

यामध्ये त्यांचे स्मिथ आणि रहाणे हे दोन खेळाडू २०१५ आणि २०१६ मध्ये पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळले होते. त्यामुळे आता या दोन खेळाडूंना ते संघात कायम ठेऊ शकतात. तसेच त्यांच्याकडे संघात कायम ठेवण्यासाठी जेम्स फॉकनर, रजत भाटिया आणि धवल कुलकर्णी या खेळाडूंचाही पर्याय उपलब्ध आहे.

उद्या आयपीएलच्या संघांना कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार हे जाहीर करावे लागणार आहे. यात उद्या कदाचित राजस्थान एकाही खेळाडूला कायम न ठेवता २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या लिलावासाठी ८० करोड खिशात ठेवण्याचीही शक्यता आहे. ज्यात ते लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरून स्मिथ आणि रहाणेला संघात कायम ठेऊ शकतील.

पण असे करणे त्यांच्यासाठी धोकादायकही ठरू शकते. कारण दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्स इलेव्हन पंजाब यांसारखे संघ कर्णधार पदासाठी स्मिथला आपल्या संघात घेण्याचा जोरदार प्रयत्न करू शकतात. त्यामुळे राजस्थानला स्मिथ आणि रहाणेला संघात कायम ठेऊन लिलावाच्या वेळी राईट टू मॅच कार्ड वापरून फॉकनर आणि रजत भाटिया किंवा धवल कुलकर्णी यांना संघात कायम ठेवण्याचा देखील एक पर्याय आहे.