आयपीएल २०१८: डिव्हिलियर्सच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर बंगलोरचा पंजाबवर विजय

0 291

बंगळुरू। आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने घरच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब संघाला पराभूत करून या मोसमातील पहिला विजय नोंदवला. त्यांनी या सामन्यात आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या शानदार अर्धशतकच्या जोरावर ४ विकेट्सने विजय मिळवला.

पंजाबने बंगलोरसमोर विजयासाठी २० षटकांत १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बंगलोरने सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमची विकेट गमावली.

त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने(२१) सलामीवीर क्विंटॉन डी कॉकला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. पण विराट काही वेळानंतर बाद झाला. त्याला १७ वर्षीय मुजीब रहमानने त्रिफळाचित बाद केले. त्यामुळे बंगलोर संघाची जबादारी आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि डिकॉकवर आली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सांभाळला.

ही जोडी पंजाबचा कर्णधार आर अश्विनने तोडली त्याने डिकॉकला ३४ चेंडूत ४५ धावांवर असताना त्रिफळाचित केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अश्विनने सर्फराज खानलाही बाद केले. त्यामुळे बंगलोरची अवस्था ४ बाद ८७ धावा अशी झाली होती.

यानंतर मात्र डिव्हिलियर्स आणि मंदीप सिंगने बंगलोरचा अवघड वाटणारा विजय आक्रमक खेळ करत सुकर केला. अखेरच्या काही षटकात षटकारांची बरसात करताना डिव्हिलियर्सने अर्धशतकही पूर्ण केले. त्याला मंदीपने चांगली साथ दिली.

डिव्हिलियरने आज एक बाजू भक्कम सांभाळताना ४० चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या साहाय्याने ५७ धावा केल्या. तो बंगलोर विजयाच्या समीप असताना बाद झाला. त्याच्यापाठोपाठ मंदीपही(२२) लगेच बाद झाला.

यानंतर शेवटच्या षटकात पंजाबला ५ धावांची गरज होती. यावेळी वॉशिंग्टन सुंदरने दोन चौकार मारत बंगलोरचा या मोसमातील पहिला विजय निश्चित केला.

पंजाबकडून आर अश्विन(२/३०), अक्षर पटेल(१/२५), मुजीब रहमान(१/२९) आणि अँड्रयू टाय(१/२७) यांनी विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, पंजाब संघ प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकात १५५ धावांवर सर्वबाद झाला. त्यांची सुरुवातही काहीशी अडखळत झाली होती. बंगलोरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने त्याच्या एका षटकात मयंक अग्रवाल(१५), ऍरॉन फिंच(०) आणि युवराज सिंग(४) या तीन फलंदाजांना बाद करून पंजाबला बॅकफूटवर ढकलले होते.

मात्र यानंतर सलामीवीर के एल राहूल(४७) आणि करुण नायरने(२९) पंजाबचा डाव सांभाळत डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी -५८ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार आर अश्विन(३३) व्यतिरिक्त पंजाबच्या बाकी फलंदाजांनीही नियमित कालांतराने विकेट गमावल्या.

अश्विनने चांगली लढत दिली. बाकी फलंदाजांपैकी मार्कस स्टोइनीस(११), अक्षर पटेल(२), अँड्रयू टाय(७) आणि मोहित शर्मा(१) यांनी धावा केल्या.

बंगलोरकडून उमेश यादव(३/२३), ख्रिस वोक्स (२/३६), कुलवंत खेजरोलिया(२/३३), वॉशिंग्टन सुंदर(२/२२) आणि युजवेंद्र चहल(१/३८) यांनी विकेट्स घेतल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या –

Comments
Loading...
%d bloggers like this: