IPL 2018: अजिंक्य रहाणेपेक्षा राजस्थान रॉयल्सचा स्मिथवरच जास्त विश्वास

मुंबई । ११व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने केवळ एकाच खेळाडूला कायम केले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथवर राजस्थान रॉयल्सने पूर्ण विश्वास दाखवला असून गेली अनेक वर्ष या संघाचा भाग असणाऱ्या अजिंक्य रहाणेला मात्र संघाने कायम केले नाही.

यामुळे २ आठवड्यांनी होणाऱ्या आयपीएल लिलावात राजस्थान कोणत्या खेळाडूला राइट टू मॅच कार्ड वापरून संघात कायम ठेवते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघ दोन वर्षाच्या बंदी नंतर यावर्षी पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार राजस्थान रॉयल्स लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून २०१५ आणि २०१६ मध्ये गुजरात आणि पुण्याकडून खेळलेल्या त्यांच्या जास्तीतजास्त ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतात.

यामध्ये त्यांचे स्मिथ आणि रहाणे हे दोन खेळाडू २०१५ आणि २०१६ मध्ये पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळले होते. त्यामुळे आता या दोन खेळाडूंना ते संघात कायम ठेऊ शकतील अशी चर्चा होती.

सध्या रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य असून उपकर्णधार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासोबत असूनही त्याला बऱ्याच वेळा संधी दिली जात नाही. परंतु आयपीएलमध्ये आजपर्यंत रहाणेची कामगिरी कायम चांगली राहिली आहे.

त्यामुळे या खेळाडूला संघात कायम का केले नाही हा प्रश्न नक्कीच त्याच्या चाहत्यांना पडला असणार.