IPL 2018: मुंबई इंडियन्स या ३ मोठ्या खेळाडूंना ठेवणार संघात कायम

हे वर्ष चालू होताच आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. आयपीएलचे तीन वेळचे विजेते मुंबई इंडियन्स यावर्षी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोन कॅप खेळाडू आणि कृणाल पंड्या या अनकॅप खेळाडूला संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की “कर्णधार रोहित शर्माला संघ कायम ठेवेल. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने तीनवेळा विजेतेपद मिळवले आहे. तसेच हार्दिक पंड्या हा मॅच विनर खेळाडू आहे आणि संघात कायम ठेवणार असलेला तिसरा खेळाडू कृणाल पंड्या असेल.”

ते पुढे म्हणाले “कोणत्याही तिसऱ्या कॅप खेळाडूला संघात ठेऊन ७ करोड देण्यापेक्षा कृणाल या अनकॅप खेळाडूला ३ करोडमध्ये संघात कायम ठेऊ शकतात. त्याचबरोबर कृणालने मागच्या वर्षी चांगली कामगिरी केली होती.”

मुंबई इंडियन्सचा हा एक हुकमी निर्णय आहे. ज्यामध्ये ते कृणालला ३ करोडमध्ये कायम ठेवून दोन राईट टू मॅच कार्ड वापरून किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह या त्यांच्या दोन खेळाडूंना संघात परत घेऊ शकतात.

मुंबई इंडियन्स ५ खेळाडूंना रिटेनेशन पॉलिसीनुसार कायम ठेवणार आहे हे सांगताना बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले “हे पाच खेळाडू त्यांच्या संघातील मॅच विनर खेळाडू असतील. जर त्यांनी या धोरणानुसार निर्णय नाही घेतला तर मात्र आश्चर्य वाटेल.”

आयपीएल संघांना त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम राहणार आहेत त्यांची नावे हे जाहीर करण्याची ४ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. यांनतर बाकी खेळाडूंचा लिलाव बंगळुरूमध्ये २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस होणार आहे.

खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचे काही नियम:

  • कोणताही संघ ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.
  • यातील लिलावात राइट टू मॅच वापरून ३ खेळाडू कोणत्याही प्रकारात जास्तीत जास्त कायम ठेवता येऊ शकतात तर एकत्र त्याची बेरीज ५ असेल. लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ३ कॅप भारतीय खेळाडू किंवा जास्तीतजास्त २ परदेशी खेळाडू किंवा २ अनकॅप भारतीय खेळाडू संघात घेऊ शकतात.
  • खेळाडूंना संघात कायम ठेवताना जर ते तीन खेळाडू कॅप खेळाडू असतील तर त्यातील पहिल्या खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्याला ११ कोटी आणि तिसऱ्याला ७ कोटी पेक्षा जास्त रुपये मोजता येणार नाहीत.
  • जर दोन कॅप खेळाडू कायम ठेवायचे असतील तर पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी आणि दुसऱ्याला ८.५ कोटीपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही.
  • संघाला एकाच खेळाडूला जर कायम करायचे असेल तर १२.५ कोटी खर्च करता येतील.

काय आहे कॅप खेळाडू आणि अनकॅप खेळाडू यांच्यातील फरक:

# कॅप खेळाडू म्हणजे ज्यांनी एक तरी आंतराष्ट्रीय सामना खेळला असेल.

# अनकॅप खेळाडू म्हणजे ज्यांना फक्त देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव आहे किंवा काहीवेळेस तोही अनुभव नसलेला खेळाडू.