IPL 2018: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने या मोठ्या खेळाडूंना केले कायम

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजू लागले आहेत. आज आयपीएलच्या संघांनी ते कोणते खेळाडू संघात कायम ठेवत आहेत त्यांची नावे जाहीर केली आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोन कॅप आणि सर्फराज खान या अनकॅप खेळाडूला कायम केले आहे.

बंगलोरने याविषयी ट्विटरवरून माहिती दिली आहे. बंगलोर संघ कर्णधार कोहली आणि डिव्हिलियर्स यांना कायम ठेवणार हे जवळ जवळ निश्चित होते. परंतु सर्फराजची संघात कायम ठेवण्यासाठी झालेली निवड नक्कीच आश्चर्याचा धक्का देणारी आहे.

बंगलोर संघाचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला मात्र त्यांनी संघात कायम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना हा आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच बरोबर यावर्षी आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यालाही संघात कायम ठेवलेले नाही.

बंगलोरचा संघ आयपीएलच्या मुख्य लिलावाच्या वेळी त्यांचे दोन राईट टू मॅच कार्ड वापरून या दोन खेळाडूंना कायम करू शकतात. आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा मुख्य लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.