आयपीएल २०१८: शेवटच्या चेंडूवर हैद्राबादचा मुंबईवर रोमांचकारी विजय

हैद्राबाद। सनरायझर्स हैद्राबादने आज मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर १ विकेटने रोमांचकारी विजय मिळवला. या सामन्यात हैद्राबादकडून रशीद खान, दीपक हुडा आणि शिखर धवनने विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हैद्राबाद समोर १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादच्या सलामीवीर शिखर धवन आणि रिद्धिमान सहाने चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी ६२ धावांची सलामी भागीदारी रचली.

मात्र त्यानंतर मुंबईचा युवा गोलंदाज मयंक मार्कंडेने उत्कृष्ट गोलंदाजी करताना हैद्राबादच्या फलंदाजीला वेसण घातले. त्यांने आज तब्बल ४ विकेट घेताना फक्त २३ धावा दिल्या आहेत.

मार्कंडेनेच सहा आणि धवनला बाद केले. सहाने २० चेंडूत २२ धावा केल्या, तर धवनने ८ चौकारांसह २८ चेंडूत ४५ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यावर हैद्राबादच्या बाकी फलंदाजांनी नियमित अंतराने आपल्या विकेट गमावल्या. फक्त दीपक हुडा शेवटपर्यंत एक बाजू लढवत होता.

त्याने हैद्राबादच्या हातातून निसटत चाललेला सामना विजयाच्या समीप आणला. त्याने शेवटच्या काही षटकात चांगली आक्रमक फलंदाजी केली. हैद्राबादला शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना हूडाने(३२) उत्तम खेळ करत हैद्राबादला विजय मिळवून दिला . त्याला या षटकात नवख्या बिली स्टेनलाक(५*) ने चांगली साथ दिली.

हैद्राबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर १ धावेची गरज होती तर मुंबईला १ विकेटची गरज होती. या चेंडूवर स्टेनलाकने चौकार ठोकत हैद्राबादचा विजय निश्चित केला.

हैद्राबादच्या बाकी फलंदाजांपैकी केन विलियम्सन(६), मनीष पांडे(११), शाकिब अल हसन(१२) आणि युसूफ पठाण(१४) यांनी धावा केल्या. तसेच त्यांचे तीन खेळाडू शून्य धावेवर बाद झाले.

मुंबईकडून मयंक मार्कंडे (४/२३), मुस्तफिझूर रहीम (३/२४) आणि जसप्रीत बुमराह(२/३२) यांनी विकेट घेतल्या.

तत्पूर्वी मुंबईकडून एवीन लेविस(२९), किरॉन पोलार्ड(२८) आणि सूर्यकुमार यादव(२८) यांनी थोडीफार लढत दिली. पण बाकी फलंदाजांनी विशेष काही केले नाही.

मुंबईच्या बाकी फलंदाजांपैकी कर्णधार रोहित शर्मा(११), ईशान किशन(९), कृणाल पंड्या(१५), बेन कटिंग(९), मयंक मार्कंडे(६*) आणि जसप्रीत बुमराह(४*) यांनी धावा केल्या. तसेच हैद्राबादकडून आज रशीद खानने तब्बल १८ चेंडू निर्धाव टाकले. त्याने त्याच्या ४ षटकात फक्त १३ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.

हैद्राबादच्या अन्य गोलंदाजांपैकी संदीप शर्मा(२/२५), बिली स्टेनलाक(२/४२), सिद्धार्थ कौल(२/२९) आणि शाकिब अल हसन(१/३४) यांनी विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीला २० षटकात ८ बाद १४७ धावांवर रोखले.