आयपीएल २०१८: हैद्राबादचा कोलकातावर ५ विकेट्सने विजय

कोलकाता। आज सनरायझर्स हैद्राबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर ५ विकेट्सने विजय मिळवत या मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सनने अर्धशतकी खेळी केली.

कोलकाताने हैद्राबादसमोर विजयासाठी १३९ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने आक्रमक खेळणाऱ्या सलामीवीर फलंदाज रिद्धिमान सहाची(२४) विकेट चौथ्या षटकातच गमावली. त्याच्यापाठोपाठ शिखर धवन(७) आणि मनीष पांडेही(४) ही बाद झाले.

त्यामुळे हैद्राबादची अवस्था ३ बाद ५५ धावा अशी झाली होती. मात्र यानंतर कर्णधार विलियम्सन आणि शाकिब अल हसनने हैद्राबादचा डाव सांभाळताना ५९ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. यामुळे हैद्राबादच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

पण ही जोडी तोडण्यात पियुष चावलाला यश आले. त्याने शाकिबला २७ धावांवर असताना बाद केले. त्याच्यानंतर काहीवेळाने मिशेल जॉन्सनने विलियम्सनलाही बाद केले. विलियम्सनने आज १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ५० धावांची खेळी केली.

हे दोघे जेव्हा बाद झाले तेव्हा वजय हैद्राबादच्या आवाक्यात आला होता. त्यामुळे दीपक हुडा(५) आणि युसूफ पठाणाने(१७) उरलेल्या धावा पूर्ण करून हैद्राबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोलकाताकडून सुनील नारायण(२/१७), मिशेल जॉन्सन(१/३०), पियुष चावला(१/२०) आणि कुलदीप यादव(१/२३) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, कोलकाताकडून ख्रिस लिन आणि कर्णधार दिनेश कार्तिकने(२९) थोडीफार लढत दिली होती. पण बाकी फलंदाजांकडून निराशा झाली. ख्रिस लिनचे अर्धशतक फक्त १ धावेने हुकले. त्याने आज ३४ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

कोलकाताकडून बाकी फलंदाजांपैकी रॉबिन उथप्पा(३), नितीश राणा(१८), सुनील नारायण(९), आंद्रे रसल(९), शिवम मावी(७), शुभमन गिल(३) आणि मिशेल जॉन्सन(४*) यांनी धावा केल्या.

तर हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार(३/२६), बिली स्टॅनलेक(२/२१), शाकिब अल हसन(२/२१) आणि सिद्धार्थ कौल(१/३७) यांनी विकेट घेत कोलकाताला ८ बाद १३८ धावांवर रोखले.