IPL 2018: रॉयल चॅलेंजर्स या मोठ्या खेळाडूला देणार डच्चू !

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी आयपीएल संघांना कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार हे जाहीर करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता कोणते संघ कोणते खेळाडू कायम ठेवतात याबद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात असणारे भारतीय कर्णधार विराट कोहली, ए बी डेव्हिलियर्स, ख्रिस गेल, युजवेंद्र चहल आणि केदार जाधव ही मोठी नावे आहेत. त्यामुळे जर यातील कोणतेही तीन खेळाडू जरी बंगलोरने संघात कायम ठेवले तरी त्यांना आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार ३३ करोड खर्च करावे लागतील.

बंगलोर संघासाठी आयपीएलचा १० वा मोसम खराब गेला होता. त्यांना गुणतालिकेतील शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यांना १४ सामन्यांपैकी ३ सामने जिंकण्यातच यश मिळाले होते.

आता यावर्षीच्या मोसमासाठी बंगलोरचा संघ कदाचित कोहली, डेव्हिलियर्स आणि चहल या तीन खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता आहे. तसेच राईट टू मॅच कार्ड वापरून बंगलोर संघ ख्रिस गेलला कायम ठेवेल किंवा त्याला कायम न ठेवता केएल राहुल आणि केदार जाधव या दोन खेळाडूंना कायम ठेवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

तसेच चहलसाठी मागील एक वर्ष अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले गेले आहे. तो २०१७ या वर्षात अंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता त्यामुळेच त्याला बंगलोर संघ आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी कायम ठेवण्याची शक्यता आहे.

याबरोबरच जर जाधवला संघात कायम ठेवले तर तो यष्टीरक्षक म्हणून तो पर्याय ठरेल आणि काही वेळेस त्याची गोलंदाजीची कामी येईल. त्यामुळे आता बंगलोरला कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवायचे या कठीण प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे.

बंगलोर संघाचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यामुळे बंगलोरला कोणताही निर्णय घेताना त्यांचा चाहता वर्गही लक्षात घ्यावा लागणार आहे.

२७ आणि २८ जानेवारीला आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी लिलाव होणार आहे.