आयपीएल २०१८: अखेर राजस्थानचं ठरले बंगलोरला भारी

बंगळुरू। आज राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर १९ धावांनी मात करत या मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद अर्धशतक केले. तसेच बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनेही आज अर्धशतक केले आहे.

राजस्थानाने बंगलोरसमोर धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांनी बंगलोरला विजयासाठी २१८ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक केले. पण त्याचे हे अर्धशतक संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. विराट बाद झाल्यानंतर मंदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदरने चांगली लढत दिली, पण व्यतिरिक्त बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही.

विराटने आज ७ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३० चेंडूत ५७ धावा केल्या. तर मंदीपने २५ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. त्याला सुंदरने चांगली साथ देताना १९ चेंडूंतच ३५ धावा केल्या. अखेरच्या काही षटकात सुंदर आणि मंदीपने केलेल्या आक्रमणाने बंगलोरच्या विजयासाठीच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सुंदरला स्टोक्सने त्रिफळाचित केले.

त्यामुळे नंतर धावगती वाढल्यामुळे विजय बंगलोरच्या आवाक्याबाहेर गेला. बंगलोरकडून बाकी फलंदाजापैकी ब्रेंडन मॅक्युलम(४), क्विंटन डिकॉक(२६), एबी डिव्हिलियर्स(२०), पवन नेगी(३) यांनी धावा केल्या.

राजस्थानकडून श्रेयश गोपाळ(२/२२), कृष्णप्पा गॉथम(१/३६), बेन स्टोक्स(१/३२), डार्सी शॉर्ट(१/१०) आणि बेन लाफ्लीन(१/४६) यांनी विकेट्स घेत बंगलोरला ६ बाद १९८ धावत रोखले.

तत्पूर्वी, राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद अर्धशतक करताना तब्बल १० षटकार आणि २ चौकार मारताना ४५ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या आणि राजस्थानला २० षटकात ४ बाद २१७ धावांचा टप्पा पार करून दिला.

तसेच राजस्थानकडून अन्य फलंदाजांपैकी अजिंक्य राहणे(३६), डार्सी शॉर्ट(११), बेन स्टोक्स(२७), जॉस बटलर(२३) आणि राहुल त्रिपाठी(१४*) यांनी धावा केल्या. तर बंगलोरकडून ख्रिस वोक्स(२/४७) आणि युजवेंद्र चहलने(२/२२) विकेट घेतली.