कोलकाता नाईट रायडर्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघातून बाहेर

आयपीएल 2019 चा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे. येत्या 23 मार्चपासून हा आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होत आहे. मात्र हा मोसम सुरु होण्याआधीच कोलकता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

कोलकता नाईट रायडर्स संघातील वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. नागरकोटी हा मागील वर्षीही आयपीएलला मुकला होता. त्याला अजूनही पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे.

हे दोन्ही क्रिकेटपटू 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचे भाग होते. त्यामुळे त्यांना मोठी रक्कम देऊन कोलकता संघाने संघात सामील करुन घेतले होते.

2018 च्या आयपीएल लिलावावेळी नागरकोटीला कोलकताने 3.2 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले होते. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळूरु येथे आहे. त्याला तिथे पूर्णपणे बरा होण्यास साधारण 2 ते 3 महिने लागणार आहेत.

त्याच्याऐवजी कोलकता संघाने आता केरळचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरला संघात सामील केले आहे. संदीप 2013-15 या वर्षीच्या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. त्यानंतर तो आता पून्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

मावीलाही पाठीच्याच दुखापतीचा त्रास होत आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळजवळ 6 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे तोही या आयपीएलला मुकणार आहे.

त्याला 2018 च्या आयपीएल लिलावामध्ये कोलकता संघाने 3 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. त्याने 2018 च्या मोसमात 9 सामन्यात खेळताना 5 विकेट्स आणि 13 धावा केल्या होत्या.

आयपीएलच्या या 12 व्या मोसमातील कोलकताचा पहिला सामना 24 मार्चला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध होणार आहे.

कोलकताने आत्तापर्यंत 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषक २०१९मध्ये तो खेळाडू १००% खेळणार, कोहलीने अप्रत्यक्षपणे केले स्पष्ट

विश्वचषकात खेळणाऱ्या त्या ११ खेळाडूंबद्दल कोहलीचा मुद्दा गंभीरने खोडून काढला

तो महान खेळाडू म्हणतो, विराट वनडेतील सर्वात महान खेळाडू ठरणार