आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्यावरील मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंदी उठणार असून तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणामध्ये तो दोषी आढळला होता.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रमाणेच बीसीसीआयनेही स्मिथला आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याच्या राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथवर 1 वर्षाची बंदी आणली होती. तर 2 वर्ष संघाचे नेतृत्व करण्यास मनाई केली आहे. या बंदीमुळेच त्याला बीसीसीआयने 2018च्या आयपीएलमध्येही खेळण्यास नकार दिला होता.

स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे कर्णधारपद भुषवत होता. मात्र बीसीसीआयने नकार दिल्याने त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल.

रहाणे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग नसल्याने त्याला राजस्थानचे नेतृत्व करायला सोपे जाईल. मागील आयपीएलच्या हंगामात त्याने स्मिथच्या अनुपस्थितीत संघाला बाद फेरीत पोहचवले होते.

तसेच आयपीएल 2019च्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये स्मिथ खेळू शकणार नाही. कारण इंग्लंडमध्ये मे-जुलै दरम्यान वन-डे विश्वचषक आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा अविभाज्य भाग असल्याने तो आयपीएलच्या काही सामन्यांना मुकू शकतो. यामुळेही राजस्थानची फ्रॅंचायजी रहाणेला संघाचे नेतृत्व करायला सांगू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’

वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…

विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत