आयपीएल २०१८: केएल राहुलची तुफानी फटकेबाजी; पंजाबचा दिल्लीवर ६ विकेट्सने विजय!

मोहाली। आज किंग्स इलेव्हन पंजाबने केएल राहुलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. राहुलने आज आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने १४ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले.

दिल्लीने पंजाबसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात आक्रमक झाली. पहिल्या तीन षटकातच पंजाब अर्धशतक धावफलकावर लावले होते. यात केएल राहुलची फटकेबाजी महत्वपूर्ण ठरली. त्याने षटकार चौकारांची बरसात करताना १६ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. त्याचा हा झंझावात ट्रेंट बोल्टने त्याला बाद करत थांबवला.

त्याच्याआधी सलामीवीर मयंक अग्रवाल(७) लवकर बाद झाला. त्यानंतर युवराजनेही आज संथ खेळ केला. त्याने आज २२ चेंडूत १२ धावा केल्या. मात्र त्यानंतर करूण नायर आणि डेव्हिड मिलरने पंजाबचा डाव सांभाळला. नायरनेही अर्धशतकी खेळी केली.

नायरने आज ३३ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या साहाय्याने ५० धावा केल्या. यानंतर मिलर(२४*) आणि मार्कस स्टोइनीसने(२२*) उरलेल्या धावा पूर्ण करून १८.५ षटकात पंजाबचा विजय निश्चित केला.

दिल्लीकडून राहुल तेवतीया(१/२४), डॅनियल ख्रिस्तियन(१/१२), ख्रिस मॉरिस(१/२५), ट्रेंट बोल्ट(१/३४) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी दिल्लीकडून कर्णधार गौतम गंभीरने अर्धशतक केले. त्याने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. यात त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचबरोबर दिल्लीकडून रिषभ पंत(२८) आणि ख्रिस मॉरिस(२७*) यांनी चांगली लढत दिली. पण बाकी फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही.

बाकी फलंदाजांपैकी कॉलिन मुनरो(४), श्रेयश अय्यर(११), विजय शंकर(१३), राहुल तेवतीया(९) आणि डॅनियल ख्रिस्तियन(१३) यांनी धावा केल्या. तर पंजाबकडून मुजीब(२/२८), कर्णधार आर अश्विन(१/२३), मोहित शर्मा(२/३३) आणि अक्षर पटेल(१/३५) यांनी विकेट्स घेऊन दिल्लीला ७ बाद १६६ धावांवर रोखले.