योग्य संधी न मिळाल्यामुळे इरफान पठाण खेळणार दुसऱ्या संघाकडून

बडोदा । भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण येत्या काळात बडोदा संघाकडून न खेळता देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य संघाकडून खेळताना दिसू शकतो. योग्य संधी न मिळाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

ह्याच आठवडयात झालेल्या सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये संघात स्थान न देण्यात आल्यामुळे तो चांगलाच नाराज आहे. त्यामुळे त्याने दुसऱ्या संघाकडून खेळायचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

इरफानने बडोदा क्रिकेट संघटनेला पत्र लिहिले असून आपल्या नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विनंती केली आहे.

बुधवारी बडोदा क्रिकेट संघटना याबद्दल निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. ” उत्तरायण सुरु असताना इरफान पठाणने आम्हाला पत्र पाठवले असून दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. त्याने म्हटले आहे की ‘त्याला योग्य संधी मिळत नाही. शिवाय त्याच्या व्यावसायिक खेळाचा अन्य संघाला चांगला फायदा होऊ शकतो. ” असे स्नेहल पारीख म्हणाले.

पारीख हे बडोदा क्रिकेटचे सचिव आहेत.

या रणजी मोसमाच्या सुरुवातीला पठाणला बडोदा संघाचे कर्णधार करण्यात आले होते. परंतु दोन सामने झाल्यावर त्याला कर्णधारपदावरून तसेच संघातून काढण्यात आले. एवढेच नाही तर त्याला सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही संघात स्थान देण्यात आले नव्हते.