जेव्हा क्रिकेटर इरफान पठाणला दिला जातो फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

शनिवारी जाहीर झालेल्या फिल्मफेयर अवॉर्डमध्ये इरफान खानला ‘हिंदी मिडीयम’ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्याचे अभिनंदन करण्यासाठी फेमिना या मासिकाने ट्विट केले, परंतु त्यांनी त्या अभिनंदन ट्विटमध्ये चुकून इरफान खान ऐवजी इरफान पठाणला टॅग केले.

फेमिना मासिकाने ट्विटमध्ये लिहिले होते की ” या साठी नक्कीच पात्र आहेस @IrfanPathan.” या ट्विटवर इरफान पठणानेही मजेशीर उत्तर दिले.

पठाणने ट्विट केले आहे, “धन्यवाद आणि मला माफ करा मी या पुरस्कारासाठी येऊ शकलो नाही, पण तुम्ही मला पुरस्कार घरी पाठवू शकता.” यावर ट्विटरकरांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत.

सध्या चालू असलेल्या सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये इरफान पठाणला बडोदा संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे तो चांगलाच नाराज झाला आहे. त्याने बडोदा क्रिकेट संघटनेला दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे.

याआधीही या रणजी मोसमाच्या सुरुवातीला पठाणला बडोदा संघाचे कर्णधार करण्यात आले होते. परंतु दोन सामने झाल्यावर त्याला कर्णधारपदावरून तसेच संघातून काढण्यात आले.