आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(6 डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवसाखेर आॅस्ट्रेलिया संघाने 88 षटकात 7 बाद 191 धावा केल्या आहेत.

आजचा खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट गेल्याने भारताचा पहिला डाव सर्वबाद 250 धावांवर आटोपला आहे.

त्यामुळे लगेचच आॅस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. पण आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अॅरॉन फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले.

त्यानंतर इशांतने 63 व्या षटकात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला बाद केले. पेनचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. ही विकेट घेण्याबरोबरच इशांतने एक खास विक्रम केला आहे.

त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा एकूण 9 वा गोलंदाज, तर जगातील एकूण 60 वा गोलंदाज ठरला आहे.

त्याचा चालू सामना हा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा 23 वा सामना आहे. तसेच त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 41 डावात गोलंदाजी करताना त्यांच्याविरुद्ध 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 20 सामन्यात 111 विकेट्स घेतल्या आहेत.

इशांतने आॅस्ट्रेलियाप्रमाणेच इंग्लंड विरुद्धही कसोटी क्रिकेटमध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इंग्लंड विरुद्ध 56 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये इशांतची आॅस्ट्रेलिया विरुद्धची पहिली विकेट ही त्यांचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉटिंग होता. तसेच त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्धची 25 वी विकेट ही मायकल क्लार्कला बाद करत मिळवली होती आणि आज त्याने पेनला बाद करत आॅस्ट्रेलिया विरुद्ध 50 विकेट्सचाही टप्पा गाठला आहे.

विषेश म्हणजे इशांतने जेव्हा आॅस्ट्रेलिया विरुद्ध 1ली, 25 वी आणि 50 वी विकेट मिळवली, तेव्हा प्रत्येक वेळी त्याने आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराला बाद केले आहे.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज-

111 विकेट्स – अनिल कुंबळे

95 विकेट्स – हरभजन सिंग

79 विकेट्स – कपिल देव

74 विकेट्स – आर अश्विन

61 विकेट्स – झहीर खान

57 विकेट्स – इरापल्ली प्रसन्ना

56 विकेट्स – बिशनसिंग बेदी

55 विकेट्स – शिवलाल यादव

50* विकेट्स –  इशांत शर्मा

49 विकेट्स – रविंद्र जडेजा

महत्त्वाच्या बातम्या:

अॅडलेड कसोटीत शतकी खेळी केलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणासाठी हवे ‘चॉकलेट मिल्कशेक’

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव

चेतेश्वर पुजाराच्या ‘स्टिव्ह’ या टोपन नावामागचे रहस्य शेन वॉर्नने उलगडले