ISL 2017: चेन्नईयीन एफसी सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील

मुंबई: चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. चेन्नईयीनचा विक्रमी सलग चौथा विजय मिळविण्याचा प्रयत्न राहील.
चेन्नईयीनला सलामीला घरच्या मैदानावर एफसी गोवाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले. गुणतक्त्यात त्यांनी आघाडी सुद्धा घेतली होती. नंतर बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकामुळे त्यांना मागे टाकले.
फॉर्मातील प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मुंबई फुटबॉल एरीनावर आम्हाला चाहत्यांचे प्रोत्साहन मिळेल, असे मुंबईचा कर्णधार ल्युसियन गोऐन याने सांगितले.
तो म्हणाला की, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. सामन्यावर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असेल. सामन्यागणिक कामगिरी उंचावत असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्हाला बराच आत्मविश्वास मिळाला आहे.
मुंबईचा संघ घरच्या मैदानावर परतला आहे. येथे मागील सामन्यात त्यांनी गोव्यावर विजय मिळविला. त्याआधी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली होती. ब्लास्टर्सविरुद्ध बाहेरील मैदानावर खेळावे लागले.
त्यामुळे एक गुण महत्त्वाचा असल्याचे ल्युसियन म्हणाला. तो निकाल सकारात्मक होता, कारण आम्ही बाहेर खेळत होतो. कोचीमध्ये खेळणे प्रतिस्पर्ध्यांना सोपे नसते. अर्थात मला तेथील भारलेले वातावरण आवडते.
तेथून आम्ही एक गुण घेऊन परतणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे घरच्या मैदानावरील सामन्यासाठी आमचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे त्याने पुढे सांगितले.
या लढतीत चेन्नईयीनचेच पारडे जड असेल, कारण त्यांनी सलग तीन विजय मिळविले आहेत. यात मागील सामन्यात घरच्या मैदानावर गतविजेत्या एटीकेवरील 3-2 अशा नाट्यमय विजयाचा समावेश आहे.
चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, आम्हाला विजयी मालिका कायम राखायची आहे. पहिल्या सामन्यात गोव्याविरुद्ध पहिली 45 मिनिटे आमच्यासाठी खराब ठरली, पण त्यानंतर आम्ही चांगले निकाल साधले आहेत. आम्हाला हे सातत्य कायम राखायचे आहे.
मध्य फळीतील प्रभावी खेळाडू रॅफेल आगुस्टो तंदुरुस्तीनंतर परतल्यामुळे चेन्नईयीन संघ आणखी बळकट झाला आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला एटीकेविरुद्ध खेळविण्यात आले नाही.
चेन्नईयीनसाठी जेजे लालपेखलुआ याला मिळालेला फॉर्म स्वागतार्ह आहे. एटीकेविरुद्ध दोन गोल नोंदवित त्याने आपल्या आगमनाची घोषणा केली आहे.
आयएसएलमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू आहे. ग्रेगरी यांनी सांगितले की, तीन सामने झाले तरी जेजेने गोल केलेला नसणे हे काहीसे आश्चर्यच होते. सुदैवाने इतर खेळाडू गोल करीत होते. त्यामुळे त्याच्यावरील दडपण कमी झाले.