ISL 2017: एटीकेला गोव्याने बरोबरीत रोखले

कोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एटीकेला एफसी गोवा संघाने 1-1 असे बरोबरीत रोखले. गोवा संघाला ऐनवेळी कोलकत्यात दाखल व्हावे लागले, पण त्यांनी एक गुण खेचून आणत महत्त्वाचा निकाल साधला.

दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. चौथ्याच मिनिटाला मार्की खेळाडू रॉबी किन याने खाते उघडल्यानंतर वीस मिनिटांनी फेरॅन कोरोमीनास उर्फ कोरो याने गोव्याला बरोबरी साधून दिली. कोरोने वैयक्तिक नववा गोल करीत गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली. गोव्याचे सात सामन्यांत 13 गुण झाले, तर एटीकेने सात सामन्यांतून नऊ गुण मिळविले आहेत. गोव्याने सरस गोलफरकाच्या जोरावर मुंबई सिटी एफसीला मागे टाकले.

मुळ कार्यक्रमानुसार गोव्याचा संघ मंगळवारी रात्री रवाना होणार होता, पण चार्टर्ड विमानात बिघाड झाल्यामुळे प्रयाण लांबले. बुधवारी दुपारी संघ जाण्याचे ठरले होते, पण दाबोळी विमानतळावर मिग विमानाला अपघात झाला. विमानतळ काही काळ बंद ठेवावे लागले. अखेरीस संघ संध्याकाळी रवाना झाला आणि कोलकत्यात दाखल होऊन थेट मैदानावर उतरला. नियोजीत वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होणारा सामना अखेरीस रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी सुरु झाला.

तिसऱ्याच मिनिटाला एटीकेला फ्री-किक मिळाली. उजव्या बाजूला महंमद अली याचा हात चेंडूला लागला. रायन टेलर याने फ्री-कीकवर अफलातून फटका मारला. त्याने उजव्या पायाने मारलेला चेंडू नेटच्या डावीकडील कोपऱ्यात उंच गेला, तेथे सज्ज असलेल्या किनने हेडींग करीत चेंडू नेटमध्ये अचूक मारला. गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. यानंतर किनने नेहमीच्या शैलीत कोलांटउडी घेत जल्लोष केला.

प्रतीस्पर्ध्याने खाते लवकर उघडले तरी गोव्याने हार मानली नाही. 14व्या मिनीटाला कॉर्नर मिळाल्यानंतर ब्रँडन फर्नांडीसने मारलेला चेंडू सेरीटॉन फर्नाडीसकडे गेला. त्याने हेडींग करून कोरोसाठी संधी निर्माण केली, पण कोरोने मारलेला उंच मारलेला चेंडू बाहेर गेला.

त्याआधी मंदार रावदेसाई याने सुद्धा प्रयत्न केला होता. गोव्याच्या अथक प्रयत्नांना 24व्या मिनिटाला फळ मिळाले. मॅन्यूएल लँझारोटेने उजवीकडून घोडदौड करीत कोरोला सुंदर पास दिला. कोरोने एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार मार्गात येणार नाही अशा ठिकाणाहून नेटच्या दिशेने किक मारली. नेटमध्ये जाणारा चेंडू अडविण्यासाठी एटीकेचा बचावपटू प्रबीर दासने कसोशीने प्रयत्न केले, पण चेंडू त्याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला.

पुर्वार्धात टेलरचा एक फटका कट्टीमनी याने अचूकपणे अडविला. अखेरच्या मिनिटाला गोव्याच्या एदू बेदीयाने आगेकूच करीत फटका मारला. एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार झेप टाकूनही चकला, पण त्याच्या आणि एटीकेच्या सुदैवाने चेंडू बाहेर गेला. पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी होती.

उत्तरार्धात 53व्या मिनीटाला किनने मारलेला चेंडू थोडक्यात बाहेर गेला. त्यानंतरची काही मिनिटे धसमुसळा खेळ झाला. लँझारोटेने एटीकेचा बदली खेळाडू रुपर्ट नाँगरूमला ढोपराने मारले. रुपर्टने मग प्रत्यूत्तर देत त्याला ढकलून दिले. पंचांनी वेळीच धाव घेत दोघांना बाजूला केले. 63व्या मिनीटाला गोव्याच्या ब्रुनो पिन्हैरोने एटीकेच्या हितेश शर्माला पाडले.

त्यानंतर सेरीटॉन फर्नांडीसने मारलेला चेंडू हितेशच्या डोक्याला लागला. हे पाहून रुपर्ट भडकला आणि त्याने ब्रुनोला जाब विचारला. हे घडत असताना लँझारोटे पंचांशी बोलत होता, तोच एटीकेच्या झिक्यूइन्हाचा धक्का चुकून डोळ्यापाशी लागला. मग या दोघांत वाद सुरु झाला, पण पंचांनी सर्वांना शांत केले.

74व्या मिनिटाला गोव्याची चांगली संधी हुकली. मंदारला ताकदवान फटका मारता आला नाही. रिबाऊंडवर अहमद जाहौहने लँझारोटेला पास दिला, पण त्याचा फटका मुजुमदारने अडविला.

 

निकाल:  

एटीके: 1 (रॉबी किन 4)

बरोबरी विरुद्ध

एफसी गोवा: 1 (फेरॅन कोरोमीनास 24)