ISL 2017: आज एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात रंगणार सामना

पुणे। आज आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी विरुद्ध चेन्नईन एफसी संघात सामना रंगणार आहे. हा सामना पुण्याच्या घरच्या मैदानावर श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडिअमवर होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता सामना सुरु होईल.

पुणे संघाने या मोसमात आत्तापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना दिल्ली डायनामोज एफसी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र पुणे संघ विजयी पथावर परत आले. त्यांनी एटीके कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी संघांविरुद्ध विजय मिळवला आहे.

घरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यात विजयी लय कायम राखण्यासाठी आणि सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी एफसी पुणे सिटी प्रयत्न करेल.

याबरोबरच चेन्नईन एफसी संघही त्यांची विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचा हा तिसरा सामना आहे. सलामीच्या सामन्यात त्यांना २-३ अश्या फरकाने एफसी गोवा विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मात्र त्यांनी पुढच्याच सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाविरुद्ध ३-० अश्या फरकाने विजय मिळवला आहे.

या दोन्ही संघात आत्तापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यात चेन्नई संघाने विजय मिळवला आहे तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.