पराभवानंतर केरलाच्या समर्थकांनी मैदानावर घातला गोंधळ

काल ३१ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोची येथे केरला ब्लास्टर्स विरुद्ध बेंगलुरु एफसी असा सामना झाला. हा सामना केरलाच्या घरच्या मैदानावर खेळला गेला होता. बेंगलुरु एफसीने अतिरिक्त वेळेत केलेल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर हा सामना ३-१ असा जिंकला.हा सामना जिंकल्यामुळे बेंगलुरु एफसीने गुणतक्त्यात तिसरे स्थान काबीज केले. बेंगलुरुचा स्ट्रायकर मिकू याने अतिरिक्त वेळेत २ गोल केले. अतिरिक्त वेळेत एकूण तीन गोल केले गेले. त्यातील दोन बेंगलुरु एफसीने तर एक गोल केरला ब्लास्टर्सने नोंदवला.

या सामन्यापूर्वी केरला ब्लास्टर्स घरच्या मैदानावर अपराजित राहिले होते. त्यामुळे केरलाचे सर्मथक या सामन्यासाठी मोठ्या संख्येने मैदानात आले होते. अतिरिक्त वेळेत सामना गमवावा लागल्याने केरलाचे समर्थक खूप नाराज झाले. काही संतप्त समर्थकांनी बेंगलुरु एफसीच्या स्टाफवर पाण्याच्या बाटल्या फेकण्याचा प्रयन्त केला. परंतु त्या स्टाफपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षारक्षक तेथे आले आणि त्यांनी वेळीच तेथे आले आणि परिस्थिती आटोक्यात आणली.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केरलाचे कोच रेन मेऊलेंटीन यांनी दुसऱ्या सत्रात विरोधी संघाला मिळालेल्या पेनल्टीने सामन्याचा चित्र बदलल्याचे सांगितले. ” हा खूप कठीण सामना होता.आम्हाला आमची कामगिरी उंचावण्याची गरज होती. मला वाटते आम्ही दुसर्या सत्राची सुरुवात चांगली केली परंतु पेनल्टीने सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर आमचे खेळाडू उत्तम खेळ करू शकले नाहीत.”असेही ते पुढे म्हणाले.

केरलाच्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल विचारले असता ते नाराजी लपवू शकले नाहीत आणि म्हणाले,” खेळ चांगला नव्हता आणि आणि असे चालणार नाही.  खेळाडूंना देखील हे माहिती आहे.”

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# एफसी पुणे सिटी आणि बेंगलुरू एफसी यांचे ८ सामन्यानंतर पाच विजय आणि आणि तीन पराभव स्वीकारून समान १५ गुण आहेत. गोल फरकाच्या जोरावर गुणतक्त्यात पुणे सिटी दुसऱ्या स्थानावर आहे तर बेंगलुरु एफसी तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघात फक्त १गोलचा गोल फरक आहे.

# मागील सामन्यातील ५-० मोठ्या विजयामुळे पुणे दुसऱ्या स्थानावर आहे.