ISL 2018-19: जमशेदपूरविरुद्ध बेंगळुरू राखीव खेळाडूंना संधी देणार

जमशेदपूर:  हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीची बुधवारी जमशेदपूर एफसीविरुद्द लढत होत आहे. बाद फेरीपूर्वी काही आघाड्यांवर चाचणी घेण्याच्या उद्द्शाने बेंगळुरू राखीव खेळाडूंना संधी देईल.
बेंगळुरूने बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम नक्की केले, पण कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील संघ हिवाळी ब्रेकनंतर आधीसारखा फॉर्मात नाही. हे त्यांच्यासाठी चिंतेचे कारण ठरले आहे. मागील सामन्यात एफसी गोवा संघाचा 3-0 असा धुव्वा उडवित त्यांनी आत्मविश्वास पुन्हा कमावला. आता साखळी टप्याची विजयी सांगता करण्यास बेंगळुरू उत्सुक असेल.
गेल्या सहा पैकी केवळ दोन सामन्यांत बेंगळुरूला विजय मिळविता आला. त्यामुळे येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत त्यांना विजयाची गरज आहे. उभय संघांत आतापर्यंत तीन लढती झाल्या असून प्रत्येकाने एक विजय मिळविला आहे. मागील लढत गेल्या ऑक्टोबरमध्ये 2-2 अशी बरोबरीत सुटली. सर्जिओ सिदोंचाने भरपाई वेळेत गोल करून जमशेदपूरला बरोबरी साधून दिली.
कुआद्रात यांनी सांगितले की, आमचे बरेच खेळाडू बेंगळुरूमध्येच थांबले आहेत. आम्ही येथे वेगवेगळ्या संघांतील खेळाडू घेऊन आलो आहोत. यंदा बहुतांश मोसमात बेंगळुरू एफसी ब संघाकडून खेळलेल्या चार खेळाडूंना आम्ही स्टार्टींग लाईन-अपमध्ये खेळवू.
गेल्या चार अवे सामन्यांत बेंगळुरूला तीन पराभव आणि एक बरोबरी इतकीच कामगिरी करता आली आहे. त्यामुळे ही लढत जिंकून अपयशी मालिका खंडित करण्याची कुआद्रात यांना आशा आहे. बेंचवर सुद्धा ब संघातील खेळाडू असतील असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही प्रयोग करण्याच्या स्थितीत आहोत. याचे कारण आम्ही लिगमधील आमचा अव्वल क्रमांक नक्की झाला आहे. आमची स्पर्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकासाठी नाही. आम्ही काही खेळाडूंचा वेळ प्रवासात जाऊ नये आणि दुखापती टळाव्यात म्हणून त्यांना बेंगळुरूमध्येच ठेवले आहे. राखीव फळीची चाचपणी करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.
जमशेदपूरसाठी हा मोसम संमिश्र ठरला. त्यांना नऊ बरोबरी पत्कराव्या लागल्या, ज्या साखळीत सर्वाधिक ठरल्या. एफसी पुणे सिटीकडून 1-4 असा धक्का बसल्यानंतर मागील सामन्यात त्यांना चेन्नईयीन एफसीविरुद्ध बरोबरी साधावी लागली. त्यामुळे त्यांच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या.
मुख्य प्रशिक्षक सेझार फरांडो यांनी सांगितले की, पहिल्या चार संघांप्रमाणे आम्हाला सातत्याने गोल करणाऱ्या स्ट्रायकरची उणीव भासली, पण आमच्या बहुतांश गोलचा वाटा आघाडी फळीतील खेळाडूंनी मिळून उचलला. फिनिशिंगचा अभाव हे इतक्या बरोबरींचे कारण असावे. बाद फेरीस मुकणे अर्थातच निराशाजनक आहे.
बाद फेरी शक्य नसली तरी मनोधैर्य उंचावण्यासाठी विजयाचा जमशेदपूरचा प्रयत्न राहील.
फरांडो यांनी सांगितले की, घरच्या मैदानावरील हा शेवटचा सामना आहे. आम्हाला प्रेक्षकांसाठी विजय मिळवायचा आहे. संघाच्या एकूण कामगिरीचा मला आनंद वाटतो. बेंगळुरूला हरवून मोसमाची चांगली सांगता करण्याची आम्हाला आशा आहे.