ISL 2018-19: लिगमधील फॉर्म बेंगळुरू फायनलमध्ये दाखविणार का

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसी सर्वाधिक खडतर प्रतिस्पर्धी ठरला आहे. गेल्या मोसमाप्रमाणेच यावेळीही बेंगळुरूने साखळीत अव्वल स्थान मिळविले. आता अंतिम फेरीत असाच फॉर्म दाखविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
 
मागील मोसमात बेंगळुरूने दुसऱ्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीपेक्षा आठ गुण जास्त मिळविले होते. नंतर अंतिम फेरीत चेन्नईयीनकडून त्यांना घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले हा मुद्दा वेगळा आहे. यावेळीही बेंगळुरूने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले. यावेळी एफसी गोवाने तेवढेच गुण मिळविले, पण साखळीतील दोन्ही सामने जिंकल्यामुळे बेंगळुरूला अव्वल स्थान मिळाले.
 
रविवारी मुंबईमधील लढतीत गोव्याविरुद्ध मुंबईचे पारडे जड असेल. पहिला आयएसएल करंडक जिंकण्यसाठी बेंगळुरू प्रबळ दावेदार असेल. गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध आमचे दोन पराभव झाले आहेत. तुम्ही हेच दोन निकाल पाहिले तर बेंगळुरू फेव्हरीट असेल. आम्ही एक झुंज म्हणून या लढतीला सामोरे जाऊ.
 
गोव्याचे आक्रमण धडाकेबाज आहे. बचवातही त्यांनी सुधारणा केली आहे, पण यानंतरही दोन मोसमांत बेगळुरूची कोंडी करणे त्यांना शक्य झालेले नाही. चार लढतींत बेंगळरूने तीन विजय मिळविले आहेत. गोव्याचा एकमेव विजय गेल्या मोसमातील आहे. तेव्हा चुरशीच्या लढतीत गोव्याने 4-3 असा विजय मिळविला होता. त्यावेळी बेंगळुरूला दहाच खेळाडूंनिशी खेळावे लागले होते. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याला तेव्हा मैदानाबाहेर काढण्यात आले होते.
 
या मोसमात बेंगळुरूने दुहेरी यश मिळविले आहे. दोन सामन्यांत मिळून पाच गोल करताना बेंगळुरूला एकमेव गोल पत्करावा लागला आहे.
 
दोन्ही संघांची खेळण्याची शैली स्पॅनीश विचारसरणीवर आधारीत आहे. कारण दोन्ही संघांचे प्रशिक्षक स्पेनचे आहेत. यात गोव्याच्या सर्जिओ लॉबेरा यांच्याविरुद्ध बेंगळुरूच्या कार्लेस कुआद्रात यांचे पारडे जड राहील असे काही छोटे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत. लॉबेरा चेंडूवर ताबा ठेवून धडाकेबाज आक्रमक खेळाला पसंती देतात. कुआद्रात यांनी मात्र धोरणात वेळप्रसंगी बदल करण्याची तयारी ठेवल्याचे दिसून येते. त्यांचा संघ चेंडू ताब्यात असताना तसेच प्रतिआक्रमण रचताना सुद्धा सफाई दाखवितो.
 
याशिवाय बेंगळुरू संघातील भारतीय खेळाडू सरस फॉर्ममध्ये आहेत. गोव्याचा खेळ परदेशी खेळाडूंवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. खास करून फेरॅन कोरोमीनास, अहमद जाहौह आणि एदू बेदीया अशा खेळाडूंवर त्यांची मदार आहे. या मातब्बरांचा खेळ चांगला होऊ शकला नाही तर गोवा संघाला फटका बसतो.
 
दुसरीकडे बेंगळुरूचे परदेशी खेळाडू चमकू शकले नाही तर भारतीय खेळाडूंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यात सुनील छेत्री नऊ गोलांसह आघाडीवर आहे. उदांता सिंग, हरमनज्योत काब्रा, राहुल भेके यांनीही मोसमादरम्यान महत्त्वाचे योगदान दिले आहे, गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याची कामगिरी अप्रतिम होत आहे.
 
पारडे भरपूर जड असले तरी बेंगळुरूचे मैदानावरील समीकरण चुकू शकते. लॉबेरा यांनी सांगितले की, याआधी झालेल्या साखळीतील दोन लढतींच्या तुलनेत फायनल वेगळी असेल असा माझा विश्वास आहे.
 
बेंगळुरूचे मत मात्र तसे असणार नाही. साखळीतील फॉर्म फायनलमध्ये कायम राखण्याचा आणि मोसमाची सांगता जेतेपदाने करण्याचा त्यांचा निर्धार असेल. यात त्यांना यश येणार का याची उत्सुकता आहे.