ISL 2018-19: चेन्नई आणि पुण्यात विजयाचा दिलासा कोण देणार ?

चेन्नई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (2 फेब्रुवारी)  येथील नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होणार आहे. गतविजेता चेन्नईयीन क्लबच्या संघातील निराशा दूर करून पुण्याविरुद्ध खेळण्यास आतूर असेल. हा सामना संध्याकाळी 7.30वाजता सुरू होणार आहे.

त्यांच्याप्रमाणेच बाद फेरीच्या आशा संपलेल्या पुण्यालाही विजयाची गरज आहे. यात कुणाला दिलासा मिळणार हे आज कळेल.

चेन्नईयीनसाठी यंदाचा मोसम त्यांच्या इतिहासातील सर्वांत खराब ठरला आहे. 13 सामन्यांतून केवळ पाच गुण मिळवून ते तळात आहे. त्यातही घरच्या मैदानावर कमाल 18 पैकी एकच गुण ते मिळवू शकले आहेत. यंदाच्या मोसमात घरच्या मैदानावरील ही सर्वांत खराब कामगिरी आहे.

सांघिक पातळीवरच त्यांची कामगिरी घसरली आहे. बचाव आणि आक्रमण या दोन्ही बाबतीत हे घडले. त्यांच्या बचाव फळीने सर्वाधिक 25 गोल पत्करले आहेत. इतर कोणत्याही संघापेक्षा ही संख्या जास्त आहे. मैल्सन आल्वेस निलंबनामुळे, तर इनिगो कॅल्डेरोनने संघ सोडल्यामुळे बचाव आणखी कमकुवत झाला आहे.

हिवाळी ब्रेकमधील ट्रान्सफर कालावधी सी. के. विनीत आणि हालीचरण नर्झारी यांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे बचाव फळीत जोश निर्माण होण्याची अपेक्षा आहे, पण या जोडीला संघासह समन्वय निर्माण करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही.

मुख्य प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, आम्ही परदेशी खेळाडू पूर्ण कोट्यानुसार खेळवू शकतो, पण एएफसी करंडक व सुपर करंडक स्पर्धा यानंतर होणार आहेत. त्यामुळे ही संख्या मर्यादीत होते. विनीत व नर्झारी यांचे आगमन झाल्यामुळे परदेशी खेळाडूंची उणीव भरून काढण्यास हातभार लागेल. भारतीय खेळाडूंसह खेळण्यास मला आनंदच वाटेल. आम्ही परदेशी खेळाडूंत एक किंवा दोन बदल करू. मला आतापासूनच एएफसी करंडकाचे वेध लागले आहेत.

पुणे सिटी नवे प्रशिक्षक फिल ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली आशेने उतरेल. चेन्नईयीनप्रमाणेच पुणए सिटीला सुद्धा गत मोसमातील फॉर्मची पुनरावृत्ती करता आलेली नाही.

ब्राऊन यांनी सांगितले की, पुणे सिटी संचालक मंडळाने माझी नियुक्ती केली. तेव्हा सहा सामने फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला शक्य तेवढे जिंकायचे आहेत असे मला सांगण्यात आले. माझ्या तसेच क्लबच्या भवितव्यासाठी मला या आव्हानाचे महत्त्व समजते. मला या क्लबमध्ये आयएसएल प्रशिक्षक म्हणून नंतरही थांबायचे आहे असे मी खेळाडूंना सांगितले आहे. त्यासाठी चांगली छाप पाडणे हाच माझ्यासाठी एकमेव मार्ग आहे. माझ्यासाठी हे केवळ खेळाडूच करू शकतात. उद्या व उर्वरित मोसमात खेळाडू ते करतील.

पुणे सिटीने मागील दोन सामने जिंकले आहेत. आता सलग तिसऱ्या विजयासाठी ते प्रयत्नशील राहतील. यंदा फॉर्म खालावलेल्या मार्सेलिनीयोला अखेर थोडाफार सूर गवसतो आहे. आशिक कुरूनियन याची कामगिरी महत्त्वाची असेल. त्याने आशियाई करंडक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

बचावात्मक मध्यरक्षक ख्रिस्तोफ हर्ड याला करारबद्ध केल्यामुळे चेन्नईयीन संघात जान निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य क्षेत्राची ताकद थोडी वाढू शकेल. मोसमापूर्वी धनपाल गणेश याला दुखापत झाल्यामुळे मध्य क्षेत्रात उणीव निर्माण झाली होती.

आतापर्यंत मोसम खराब ठरलेल्या या संघांमध्ये ही लढत आहे. त्यात चुरस होईल. तळातील क्रमांक मिळू नये म्हणून ते जिंकण्यासाठीच खेळतील.

महत्त्वाच्या बातम्या-

ISL 2018-19: गोव्याविरुद्ध मुंबईवर पुन्हा पराभवाची नामुष्की

तो जागतिक विक्रम रोहित शर्मासाठी केवळ हाकेच्या अंतरावर

त्या क्रिकेटरच्या पत्नीमुळे श्रीलंका संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये तणाव

पैसे तयार ठेवा! डेल स्टेन होणार टीम इंडियाचा कोच