ISL 2018-19: दिल्ली-ब्लास्टर्स लढतीत दोन्ही संघांना विजयाची प्रतिक्षा

दिल्ली|  येथील नेहरू स्टेडियमवर आज (31 जानेवारी) दिल्ली डायनॅमोज एफसी आणि केरळा ब्लास्टर्स एफसी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ गुणतक्त्यात तळात आहेत. त्यामुळे त्यांना विजयाची प्रतिक्षा आहे.

दिल्लीने मागील वर्षाची सांगता विजयाने करताना चेन्नईयीन एफसीला 3-1 असे हरविले. आता नव्या वर्षाची सुरवात अशीच करण्याची त्यांना आशा असेल.

दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांनी सांगितले की, ब्रेकनंतर पहिला सामना जिंकणे फार महत्त्वाचे आहे. आम्ही चेन्नईविरुद्ध पहिलाच विजय मिळवून वर्षाचा शेवट केला. गेल्या दोन सामन्यांत आम्ही कसून प्रयत्न केले आहेत. आता ब्रेकनंतर खेळण्यास आम्ही आतूर आहोत.

दिल्लीचा संघ गोल आणि गुणांसाठी झगडतो आहे. ट्रान्स्फर विंडोच्या कालावधीत क्लब सक्रीय होता. अँड्रीया क्लाऊडेरोविच, प्रीतम कोटल, सियाम हंगल यांना क्लबचा निरोप घेतला. मेक्सिकोचा आक्रमक मध्यरक्षक युलीसीस डॅव्हीला याच्याशी करार करण्यात आला.

गोम्बाऊ यांनी पुढे सांगितले की, प्रीतम आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू होता. तो आमचा कर्णधार होता. तो खेळणाऱ्या 11 जणांच्या संघातील नियमीत खेळाडू होता, पण त्याने तसेच आमच्या क्लबने एटीकेबरोबर करार केला. त्यामुळे आता आम्हाला संघात असलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

गोल करणे ही गोम्बाऊ यांच्या संघासाठी समस्या ठरली आहेच. याशिवाय त्यांना गोल पत्करणेही भाग पडत आहे. याबाबतीत त्यांची कामगिरी संयुक्तरित्या शेवटच्या क्रमांकाची आहे. चेन्नईयीनवरील विजय मोसमात पहिलाच असला तरी दिल्लीला घरच्या मैदानावर अद्याप जिंकता आलेले नाही. गोम्बाऊ यांना याची जाणीव असेल.

योगायोग म्हणजे दोन्ही संघांनी केलेले आणि त्यांच्याविरुद्ध झालेले गोल सारखेच आहेत. हा आकडा अनुक्रमे 13 व 21 असा आहे. दिल्ली मात्र जिंकल्यास सरस गोलफरकाच्या जोरावर ब्लास्टर्सला मागे टाकू शकेल.

गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही संघ कोचीत खेळले होते. तेव्हा बरोबरी झाली होती. सी. के. विनीत याच्या गोलनंतर क्लाऊडेरोविच याने बरोबरी साधली होती. आणखी एक योगायोग म्हणजे हे दोन्ही खेळाडू आता आपापले क्लब सोडून गेले आहेत. विनीत उर्वरीत मोसमासाठी हालीचरण नर्झारी याच्या साथीत चेन्नईयीनकडे लोनवर गेला आहे.

दिल्लीप्रमाणेच ब्लास्टर्सकडेही ब्रेकदरम्यान महत्त्वाचे बदल झाले. बाओरींगबाओ बोडो याला गोकुलम केरळा संघाकडून, तर लालथुआमाविया राल्टे याला एफसी गोवा संघाकडून आणण्यात आले.

ब्रेकनंतर ब्लास्टर्सचा एक सामना झाला आहे. त्यात नेलो विंगाडा यांचा संघ एटीकेविरुद्ध घरच्या मैदानावर 1-1 अशी बरोबरी साधू शकला.

विंगाडा यांनी सांगितले की, निकाल संघाच्या दर्जाच्या तुलनेत साजेसे नाहीत. मी येथे आल्यानंतर दोन दिवसांत पहिला सामना झाला. आता खेळाडूंना माझ्या कार्यपद्धतीची आणखी चांगली ओळख झाली असेल. मला सुद्धा त्यांची क्षमता पूर्वीच्या तुलनेत जास्त लक्षात येत आहे.

गेल्या वर्षी सलामीला एटीकेला हरविल्यापासून ब्लास्टर्सच्या कामगिरीला उतरती कळा लागली आहे. त्यांना 12 प्रयत्नांत एकही सामना जिंकता आलेला नाही. आता ते फॉर्मसाठी झगडणाऱ्या दुसऱ्या एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे कदाचित निकाल बदलण्याची वेळ आली असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ISL 2018-19: नॉर्थईस्टला हरवित बेंगळुरूची पुन्हा आघाडीला मुसंडी

१६ वर्षांनंतर टीम इंडियाने मोडला स्वत:चाच नकोसा असा विक्रम

२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की