ISL 2018-19: गुरप्रीत-अमरींदर यांच्यात गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारासाठी चुरस

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) पाचव्या मोसमात सर्वोत्तम गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार मिळविण्यासाठी बेंगळुरू एफसीचा गुरप्रीत सिंग संधू आणि मुंबई सिटी एफसीचा अमरिंदर सिंग यांच्यात कडवी चुरस आहे.

बहुतेकांचे लक्ष्य फेरॅन कोरोमीनास (एफसी गोवा), बार्थोलोम्यू ओगबेचे (नॉर्थइस्ट युनायटेड) आणि अलिकडेच हॅट््ट्रीक केलेला मोडोऊ सौगौ (मुंबई सिटी एफसी) अशा गोल केलेल्या खेळाडूंवर असले तरी गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराची शर्यत जास्त उत्कंठावर्धक बनली आहे.

या घडीला गुरप्रीत आघाडीवर आहे. पहिल्या तीन जणांमध्ये बेंगळुरूकडून यंदाच्या मोसमातक प्रत्येक मिनीटे खेळलेला तो एकमेव गोलरक्षक आहे. तो एकूण एक हजार 530 मिनिटे मैदानावर आहे. यंदा केवळ एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य त्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करू शकतो, पण अमरिंदर अखेरच्या क्षणापर्यंत त्याच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतो.

25 वर्षीय अमरींदर गोलरक्षणाची जबाबदारी पार पाडत असताना मुंबईविरुद्ध केवळ 16 गोल झाले. याचे प्रमाण 89 मिनिटे 56 सेकंदांना एक गोल इतके आहे. यंदा सर्वाधीक सहा क्लीन शीट््स राखण्यात अमरींदर यशस्वी ठरला यात म्हणूनच काही आश्चर्य नाही. मुंबईच्या बाद फेरीतील प्रवेशाचे बहुतांश श्रेय पंजाबच्या या गोलरक्षकाला दिले जात आहे. मोसमाच्या प्रारंभी अमरींदरला तीन वर्षांचा करार देऊ करण्यात आला. त्यामुळे आपल्यावर खर्च करण्यात आलेल्या प्रत्येक पैशाचा तो पुरेपूर मोबदला देत आहे.

गुरप्रीत हा भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक आर्थिक मोबदला मिळालेला गोलरक्षक आहे. युरोपमधील अनुभवाचा तो आयएसएलमध्ये चांगला वापर करीत आहे. गुरप्रीत नेटचे रक्षण करीत असल्यामुळे बेंगळुरूच्या बचाव फळीचे काम सुकर झाले आहे. दिल्ली डायनॅमोजविरुद्ध झालेले तीन गोल हाच यास एकमेव अपवाद ठरले.

गुरप्रीतने पाच क्लीन शीट््स राखल्या आहेत. त्याने यंदा सर्वाधिक 55 वेळा बचाव केला आहे. संघाची कामगिरी सर्वोत्तम होत नसताना कित्येक सामन्यांत त्याने एकहाती गुण मिळवून दिले आहेत.

आयएसएलच्या आकडेवारीनुसार गुरप्रीतविरुद्ध 90 मिनिटांमागे एकच गोल होतो. यानंतर अमरींदरची सरासरी 89 मिनिटे 56 सेकंद इतकी आहे. या क्रमवारीत पवन कुमार तिसरा आहे. एल्को शात्तोरी प्रशिक्षक असलेल्या नॉर्थइस्टने यंदा प्रथमच बाद फेरी गाठली आहे.

पाच क्लीन शीट््स व 52 बचाव नोंदविलेल्या पवनने टी. पी. रेहेनेश याला मागे टाकून अव्वल पसंतीचा गोलरक्षक असे स्थान निर्माण केले आहे. नॉर्थईस्टला रेहेनेशच्या सातत्याच्या अभावाचा फटका बसला होता. अशावेळी शात्तोरी यांनी आपल्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास सार्थ असल्याचे 28 वर्षीय पवनने दाखवून दिले आहे.

मुख्य म्हणजे दडपणाच्या स्थितीत त्याने पोलादी जिगर प्रदर्शित केली आहे. त्याचे बचावाचे रेकॉर्ड सुद्धा सफाईदार आहे. या तिघांच्या कामगिरीवरून आयएसएलमध्ये यशासाठी भक्कम गोलरक्षक मोलाचा असल्याचे दिसून येते. आता बाद फेरी नजिक आली असताना हे तिघे यशातील महत्त्वाचा घटक ठरतील.