ISL 2018-19: सातत्यपूर्ण एफसी गोवा संघाला परिपूर्ण बनण्यासाठी जेतेपद हवे

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला आधीच्या चार मोसमांत आतापर्यंत जेतेपद मिळविता आलेले नाही. यानंतरही त्यांच्या सातत्याचा प्रतिस्पर्धी संघांच्या चाहत्यांनाही हेवा वाटेल. अशावेळी परिपूर्ण बनण्यासाठी गोवा संघाला जेतेपदाची गरज आहे.
2014 मध्ये आयएसएल सुरु झाली. तेव्हापासून ब्राझीलचे झिको आणि त्यानंतर स्पेनचे सर्जिओ लॉबेरा यांनी एफसी गोवाला मार्गदर्शन केले आहे. झिको यांची ब्राझीलीयन सांबा असो किंवा लॉबेरा यांचा स्पॅनीश टिकी टाका, एफसी गोवाची कोणतीही शैली त्रयस्थ चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरली आहे.

पाच पैकी चार मोसमांत एफसी गोवाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. एकदा त्यांनी अंतिम फेरी गाठली, पण घरच्या मैदानावर त्यांना चेन्नईयीन एफसीकडून पराभूत व्हावे लागले. बाद फेरीच्या बाबतीत मात्र एफसी गोवाचे चार प्रवेश सर्वोत्तम कामगिरी आहे. एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांनी प्रत्येकी तीन वेळा ही कामगिरी केली आहे.

मैदानावर एफसी गोवाचा खेळ जोशपूर्ण होतो. आयएसएलमध्ये सर्वाधिक 36 सामने जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. प्रत्येकी दोन वेळा विजेते ठरलेल्या चेन्नईयीनला 32, तर एटीकेला 28 विजय मिळविता आले आहेत. अशावेळी एफसी गोवाची ही कामगिरी किती प्रभावी आहे हे लक्षात येते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही माजी विजेत्यांना यंदा बाद फेरीत प्रवेश करता आलेला नाही.

पाच मोसम मिळून एफसी गोवाने 148 गोल केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीच्या खात्यात 126 गोल जमा आहेत. हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. 2015चा अपवाद वगळल्यास बाद फेरी गाठली त्या प्रत्येक वेळी एफसी गोवाचा गोलफरक लिगध्ये सर्वत्तम ठरला आहे. 2015 मध्ये त्यांचा गोलफरक चेन्नईयीन एफसीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा होता.
ब्राझीलचे दिग्गज झिको यांच्या कार्यकालात एफसी गोवा संघ आकर्षण ठरू लागला. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सुत्रे स्विकारली तेव्हा एफसी गोवाने बाद फेरी गाठली. तेव्हा गुणतक्त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर होते. बाद फेरीत त्यांचा एटीकेविरुद्ध पराभव झाला. 2015 मधील मोसम त्यांच्यासाठी आणखी सरस ठरला. त्यांनी गुणतक्त्यात आघाडी घेत बाद फेरी गाठली. अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर त्यांचा चेन्नईयीनकडून पराभव झाला.

2016चा मोसम धक्कादायक ठरल्यानंतर पुढील दोन मोसमांत सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बाद फेरी गाठताना एफसी गोवाने नेत्रदिपक शैली प्रदर्शित केली. लिगमधील सर्वाधिक मनोरंजक खेळ करणारा संघ असा लौकीक एफसी गोवाने निर्माण केला आहे. लॉबेरा यांच्याकडे प्रशिक्षकद आल्यापासून एफसी गोवाने आक्रमणात सातत्याच्या जोडीला आणखी भेदकता निर्माण केली आहे. बचावातही त्यांनी नियमित सुधारणा केली आहे.

यंदा बाद फेरीचे स्थान नक्की झाल्यानंतर लॉबेरा यांनी सांगितले की, आघाडीवर तेवढ्याच संधी निर्माण करण्याच्या जोडीला बचावात सुधारणा केल्यामुळे मला आनंद वाटतो.  आम्हाला एकाग्र राहावे लागेल, सराव कायम ठेवावा लागेल आणि जमिनीवर राहावे लागेल.
यंदाच्या मोसमात काही संघांच्या कामगिरीत चमकदार ते ढिसाळ इतका टोकाचा बदल झाला असताना एफसी गोवाने सातत्य प्रदर्शित केले आहे.

यानंतर आव्हान असेल ते दुर्मिळ ठरलेले जेतेपद मिळविणे. तसे झाल्यास एफसी गोवा क्लब परिपूर्ण बनेल. मग त्यांच्या कट्टर चाहत्यांना जल्लोषाची पर्वणी सुद्धा मिळेल.