ISL 2018-19: जमशेदपूरची एटीकेविरुद्ध बरोबरी

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (२१ ऑकटोबर) येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसी आणि अटलेटिको दी कोलकाता (एटीके) यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. सुमारे २३ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने चेंडूवर सरस ताबा ठेवूनही जमशेदपूरला चांगल्या चालींचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. दुसरीकडे एटीकेच्या आघाडी फळीला लौकीकानुसार खेळ करता आला नाही.

दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. ३५व्या मिनिटाला स्पेनच्या सर्जिओ सिदोंचा याने जमशेदपूरचे खाते उघडले. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत एटीकेला कर्णधार व स्पॅनिश खेळाडू मॅन्यूएल लँझरॉत याने बरोबरी साधून दिली. ही कोंडी अखेरपर्यंत सुटू शकली नाही.

जमशेदपूरची तीन सामन्यांतील ही दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले असून गुणतक्त्यात दुसरे स्थान गाठले आहे. एटीकेला चार सामन्यांत पहिली बरोबरी पत्करावी लागली. एक विजय व दोन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. चार गुणांसह त्यांचे सातवे स्थान कायम राहिले आहे.

दोन्ही संघांनी उल्लेखनीय प्रयत्न केले. खाते उघडण्याच्या शर्यतीत जमशेदपूरची सरशी झाली. सिदोंचा याने फ्री किकवर सफाईदार फटका मारला. हा चेंडू एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने झेप टाकल्यानंतर त्याच्या हाताला लागून नेटमध्ये गेला. एटीकेने पूर्वार्धातील तीन मिनिटांच्या भरपाई वेळेत बरोबरी साधली. लँझरॉतने उजवीकडून कॉर्नर घेत अफलातून फटका मारला. जमशेदपूरचा गोलरक्षक शुभाशिष रॉय याने झेप टाकली, पण चेंडू त्याच्या ग्लोव्ह््जना लागून नेटमध्ये गेला.

पूर्वार्धात दोन्ही संघांनी सुरवातीला मध्य क्षेत्रात खडाखडी केली. जमशेदपूरच्या सिदोंचाने एव्हर्टन सँटोसला पाडले. पाचव्या मिनिटाला कॅहीलने उजवीकडून घोडदौड करीत काही बचावपटूंना चकवित पास देण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू ब्लॉक करण्यात आला. पुढच्याच मिनिटाला मारीओ आर्क्वेस याने डावीकडून आगेकूच करीत थेट नेटसमोर फटका मारला, पण एटीकेच्या गेर्सन व्हिएरा याने हेडिंग करून आपले क्षेत्र सुरक्षित राखले. १२व्या मिनिटाला आर्क्वेसचा प्रयत्न स्वैर फटक्यामुळे यशस्वी ठरू शकला नाही.

१५व्या मिनिटाला जमशेदपूरच्या मायकेल सुसैराजने डावीकडून चाल रचत बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने सिदोंचा याला क्रॉस पास दिला, पण सिदोंचा याने मारलेला चेंडू भट्टाचार्य याने ब्लॉक केला. रिबाऊंडवर रॉबीन गुरुंगचा प्रयत्न उंच आणि स्वैर फटक्यामुळे फसला.

एटीकेचा पहिला प्रयत्न १७व्या मिनिटाला झाला. उजवीकडे मिळालेला कॉर्नर घेत लँझरॉतने चेंडू बॉक्समध्ये मारला. त्यावर पलिकडील बाजूला बलवंत सिंगने चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण त्याला जमशेदपूरने रोखले. चार मिनिटांनी एटीकेच्या कोमल थातल याने बॉक्समधून वाजवीपेक्षा जास्त ताकद लावल्यामुळे फटका फसला.

२५व्या मिनिटाला सिदोंचाने सेट-पीसवर बॉक्समध्ये मारलेला चेंडू एटीकेच्या रिकी लल्लावमावमा याने थोपविला. हा चेंडू जेरी माहमिंगथांगा याच्याकडे गेला. त्याने मारलेला फटका स्वैर होता. पुढच्याच मिनिटाला सिदोंचाने मारलेला चेंडू व्हिएराने ब्लॉक केला.

३१व्या मिनिटाली एटीकेची चाल झाली. रिकीने डावीकडून पलिकडील बाजूला चेंडू मारला तेव्हा कुणी सहकारी नव्हते. त्यामुळे हा चेंडू जमशेदपूरच्या टिरीने अडविला. मायकेलने प्रतिआक्रमण रचत कॅहील याला पास दिला, पण त्याला सँटोसने धसमुसळा खेळ करून पाडले. त्यामुळे सँटोसला यलो कार्ड दाखविण्यात आले. ३२व्या मिनिटाला जमशेदपूरची फ्री किक मारिओच्या स्वैर फटक्यामुळे वाया गेली.

दुसऱ्या सत्रात प्रारंभी सिदोंचा याने रचलेल्या चालीवर मायकेलने मारलेला फटका स्टँडमध्ये गेला. नंतर फ्री किकवर सिदोंचा याचा फटका स्वैर होता. सिदोंचाने ६०व्या मिनिटाला पास दिल्यानंतर गुरुंग आगेकूच करीत होता, पण प्रोणाय हल्दरने त्याला रोखले. ६४व्या मिनिटाला मारीओच्या पासवर कॅहील हेडिंगद्वारे भट्टाचार्यला चकवू शकला नाही.

७६व्या मिनिटाला एटीकेच्या रिकीने जमशेदपूरच्या सुमित पासीला चकवित बलवंतला पास द्यायचा प्रयत्न केला, पण तो चाल पूर्णत्वास नेऊ शकला नाही. ८९व्या मिनिटाला ऐबोर्लांग खोंगजी याने क्रॉस पास दिल्यानंतर बलवंत चेंडूपर्यंत वेळीच जाऊ शकला नाही.

भरपाई वेळेत जमशेदपूरचा बदली खेळाडू कार्लोस कॅल्वोने कॉर्नरवर नेटपाशी मारलेला चेंडू भट्टाचार्यने थोपविला. हा चेंडू मिळताच जेरीने परत कार्लोसच्या दिशेने मारला. कार्लोसच्या फटक्यावर हेडींगने चेंडू बाहेर घालवित मारिओने एटीकेचे नेट सुरक्षित राखले.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे

सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद